शिक्षण मात्र ऑनलाईनच : संचारबंदीचा परिणाम नाही
प्रतिनिधी / पणजी
येत्या सोमवारी दि. 21 जूनपासून ठरल्याप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 ची सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांची शिकवणी मात्र ऑनलाईन करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण खात्याने सरकारला पाठवला असून त्यावर अद्याप सरकारने निर्णय दिलेला नाही. पहिली ते बारावीपर्यंतच्या सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे.
राज्यातील संचारबंदी सोमवार दि. 21 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून ती जरी पुढे वाढविली तरी त्याचा कोणताही परिणाम शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर होणार नसल्याचे शिक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
शिक्षक -शिक्षकेतर तसेच प्रशासकीय कर्मचारी वर्गाने शाळेत येऊन आपापली कामे नियमितपणे करावीत आणि त्यांची शिकवणी ऑनलाईन मार्गाने घ्यावी, असा हा प्रस्ताव आहे.
कोरोनाचे संकट अजूनही कायम
राज्यात कोरोनाचे संकट अजूनही कायम असून ते कमी होत असले तरी कोरोनाबाधित व बळींचे सत्र सुरूच आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे धोक्याचे ठरू शकते. म्हणून त्यांना ऑनलाईन पद्धतीने श्किवण्याशिवाय पर्याय नाही. त्या प्रस्तावास मान्यता देण्याशिवाय सरकारला गत्यंतर नाही, असे सध्याचे चित्र आहे. शिक्षण खात्याचा हा प्रस्ताव सरकार मान्य करून शैक्षणिक वर्ष 21 जूनपासून सुरू करेल, अशी आशा शिक्षण खाते बाळगून आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्ष जूनच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होते. परंतु कोरोना संकटामुळे यंदा ते वर्ष उशिराने 21 जूनपासून पासून सुरू होत आहे. दहावी-बारावी परीक्षा रद्द झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा तयार करण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री डॉ. प्रमोद सावंत काय ठरवतात, याकडे शिक्षण खात्याचे लक्ष लागून राहिले आहे.









