मुंबई/प्रतिनिधी
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर अशा सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ कुटुंबावर १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी लावला आहे. दरम्यान, मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. त्यांच्या या आरोपसत्रावरुन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग सुरू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ज्या संस्थेची किरीट सोमय्या बदनामी करत होते त्या संस्थेने सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून शिवडी कोर्टाने तसे आदेश पारित केले आहेत, असे ते म्हणाले.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर जोरदार टीका केली. मुश्रीफ यांच्यावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली होती. त्यात त्यांना काही मिळाले नाही. दोन वर्ष झाली तरी या प्रकरणी कारवाई झाली नाही. आज सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने करत आहेत. सोमय्या यांना कोणीही सीरियस घेत नाही. स्वत:चा बडेजाव निर्माण करून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम ते करत आहे. इतरांच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्या. मुलगा कुणाला फोन करतो, कुणाला खंडणी मागतो, तुमचे नातेवाईक काय करतात, त्यांच्या किती बोगस कंपन्या आहेत, ते कसं मनी लॉन्ड्रिंग करतात हे पण लोकांना माहीत आहे, असं मलिक म्हणाले.
सोमय्या यांनी काही भाजपच्या नेत्यांच्या कंपन्यांचीही नावे घेतली होती. त्यामुळे त्या नेत्यांचं पद गेलं. त्या काळात त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबत सर्वात जास्त पत्रकार परिषद घेऊन हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळांना कोर्टाने दोषमुक्त केलं. म्हणजेच राजकीय हेतूने बिनबुडाचे आरोप करायचे, बदनामीचे कटकारस्थान करायचे आणि सरकारला, मंत्र्यांना बदनाम करायचं हे उघड झालं आहे. काही दिवसांपासून पुन्हा सोमय्या सक्रिय झाले. केंद्राने त्यांना ४० पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी दिला आहे. त्यांना धोका नसताना ही सुरक्षा निर्माण करून लोकांमध्ये वेगळं वातावरण करण्याचं काम भाजपकडून होत आहे, असं ते म्हणाले.