उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील कोणताही नवमतदार निवडणुकीपासून वंचित राहू नये, यासाठी नवमतदारांची शंभर टक्के नोंदणी करा, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी, शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाई, तहसीलदार अर्चना शेटे, महानगरपालिकेचे निवडणूक अधीक्षक सुधाकर येडूवाढ, सहाय्यक अधीक्षक विजय वणकुद्रे, राज्य परिवहन महामंडळाचे कोल्हापूर विभागीय वाहतूक अधीक्षक उत्तम पाटील आदी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात होते. ही परंपरा यापुढेही सुरू राहण्यासाठी अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. हे काम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर फोकस
नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ व अन्य महाविद्यालयांमधील विद्यार्थी फोकस करण्यात येणार आहेत. त्यांची नोंदणी करण्यावर भर द्या, असे आवाहनही भगवान कांबळे यांनी केले.









