दुरुस्तीकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष : पाणी टंचाईची समस्या : नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात नळाद्वारे पाणीपुरवठा झाला नसल्यास विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र, रामलिंगखिंड आणि कडोलकर गल्ली तसेच विविध परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणाऱया नवग्रह मंदिराशेजारील जलशुद्धीकरण यंत्राला लागलेल्या गळतीद्वारे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. दुरुस्तीकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने पाणी वाया जात आहे.
पाणीपुरवठा सुरळीत केला जात नसल्याने पाण्याची टंचाई भेडसावत आहे. ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती तर, विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होत आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राकसकोप आणि हिडकल जलाशयांद्वारे शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पण पाणीसाठा कमी झाल्यास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. अशा वेळी नागरिकांकडून नळाच्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी केला जातो. दैनंदिन वापरासाठी विहिरी किंवा कूपनलिकांच्या पाण्याचा वापर बेळगावकर करीत आहेत. त्याकरिता महापालिका प्रशासनाने विहिरींचे पुनरुज्जीवन करून जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून पाणीपुरवठा चालविला आहे. प्रत्येक गल्लीत कूपनलिकांचे पाणी पुरविण्यासाठी सिन्टेक्स टाक्मया बसविल्या आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावत नाही.
किर्लोस्कर रोड नवग्रह मंदिरशेजारी विहिरीचे पाणी शहरवासियांना पुरविण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविली आहे. मिनी फिल्टर प्लांट म्हणून बसविलेल्या जलशुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध पाणी रामलिंगखिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली तसेच मारुती गल्ली आदी भागात पुरविण्यात येते. पण विहिरीशेजारी बसविलेल्या जलशुद्धीकरण यंत्राच्या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागली आहे. एअर व्हॉल्वमधूनही पाणी वाया जात आहे. दररोज शेकडो लिटर पाणी गटारीद्वारे वाहत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. जलशुद्धीकरण यंत्राची दुरुस्ती करण्यात यावी याकरिता पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार केली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याची बचत करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात येते. पण प्रत्यक्षात पाणीपुरवठा मंडळाकडून पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
पाण्याचा अपव्यय थांबवा

एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, दुसरीकडे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असून दुरुस्ती करण्याकडे पाणीपुरवठा मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. नवग्रह मंदिराशेजारी पाण्याद्वारे असंख्य नागरिकांच्या पाण्याची समस्या दूर होत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे वाया जाणाऱया पाण्याची बचत करण्यासाठी दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी माजी महापौर सरिता पाटील यांनी केली आहे.
– माजी महापौर सरिता पाटील









