-महापालिका पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी
बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रभाग आरक्षणाची लॉटरी फुटली आणि शहरात इच्छुकांच्या बॅनरबाजीला उधाण आले. बॅनरबाजी करणाऱया उमेदवारामध्ये नवख्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. तर नेहमी रिंगणात उतरणारे अनुभवी पडद्याआडून गाठीभेटी घेत जोडणीला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाहीत तोपर्यंत प्रत्यक्ष समोर यायचे नाही असा अनुभवींचा अजेंडा दिसून येत आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीची तारीख जाहीर झाली नसली तरी प्रभाग आरक्षण सोडत झाली असल्यामुळे निवडणूक लवकरच होणार हे स्पष्ट आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणूकीचे चित्र बऱयापैकी स्पष्ट झाले आहे. पण प्रत्यक्षात राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात नाहीत तोपर्यंत उमेदवारी ठरत नाही. प्रत्येक प्रभागातून डझनभर उमेदवार रिंगणात उतरणार हे सत्य आहे. निवडणूकीची तारीख कधीही जाहीर होऊ दे, पण सध्या इच्छुकांची मांदियाळी आहे. मनाप्रमाणे प्रभाग आरक्षण पडल्यानंतर अनेकांनी त्याचदिवशी निवडणूक जिंकल्याप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी केली. यानंतर आता डिजिटल फलक उभारण्यावर भर दिसत आहे. सण-उत्सवाच्या निमित्ताने फलक लावून शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागली आहे. गेल्या पाच वर्षात कोणत्या तरी निमित्ताने राजकीय नेत्याजवळ उभा राहून काढलेले जुने फोटो, कोरोनाच्या काळात कोणाला तरी केलेल्या मदतीचे फोटो फलकावर झळकवून आपण समाजकार्यात कसे अग्रेसर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भागातील लोकांचे वाढदिवस शोधून इच्छुक उमेदवारांकडून त्याला पुष्पगुच्छ देत फोटो काढून घ्यायचा आणि तात्काळ सोशल मिडियावर व्हायरल करत वाढदिवस असणारी व्यक्ती आपल्या किती जवळची आहे हे भासवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे. त्यातही यामध्ये बहुसंख्य तरुण नवखे आहेत. हे इच्छुक नवखे तरुण बॅनरबाजीत पुढे आहेत.
महापालिकेच्या निवडणूकीचा 20 ते 25 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार मात्र फलकावर न येता पडद्याआडून नागरिकांच्या भेटीगाठी आणि अंदाज घेत आहेत.या भेटीगाठीतून मतांच्या बेरीज-वजाबाकीची आकडेमोड करत आहेत.ही आकडेमोड करत राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. प्रभागातील हक्काच्या मताबरोबर राजकीय पक्षांची ताकद मिळावी यासाठी नेत्यांच्या पाठीमागे हे इच्छुक उमेदवार फिरत आहेत. तसेच राजकीय पक्षांकडून आर्थिक पाठबळ मिळत असल्यामुळे अशा उमेदवारांचा पक्षाचे तिकिट मिळवण्यावर भर आहे. त्यापैकी अनेकजण राजकीय पक्षांची उमेदवारी न मिळाल्यास निवडणूकीच्या रिंगणातून बाहेर जाणार आहेत. यामुळेच असे उमेदवार बॅनरबाजी करण्याचे टाळत आहेत.
दक्षिण मतदार संघात आतापासूनच जेवणावळी सुरु-
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात कोणताही निवडणूक चुरशीची असते. यामुळे आर्थिक उलाढालही तितकीच होती. प्रभाग आरक्षण सोडत झाल्यानंतर एका अनुभवी इच्छुक उमेदवारांने ज्या प्रभागातून निवडणूकीत उतरणार आहे त्या प्रभागात जेवणावळी सुरु केल्या आहेत. सकाळी आणि रात्री अशा जेवणावळी सुरु असून यासाठी एका माणसामागे साडेचारशे रुपये खर्च केले जात आहेत.