ऐन दिवाळीत सात शेतकऱ्यांचे नुकसान
प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सात शेतकऱ्यांचा सुमारे तीन एकरांतील ऊस जळून खाक झाला आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
नरतवडे येथे नदी पाणवठा रोडवर विद्युत तारेत स्पार्किंग होऊन उसाच्या शेताला आग लागली. दुपारची वेळ असल्याने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. याच वेळी शेजारी काही शेतकरी भात कापत होते त्यांना ऊस पेटताना दिसला. तात्काळ त्यांनी शेतात धाव घेतली आणि आग विझवण्यास सुरुवात केली. जीवाची परवा न करता अनेक शेतकऱ्यांनी उभ्या उसाचा भांगा घातला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली मात्र संगीता सावंत नामदेव सूर्यवंशी आनंदा सूर्यवंशी, मधुकर सूर्यवंशी, गौतम कांबळे, संजीवनी कदम, सुरेश कदम या शेतकऱ्यांचा तीन एकरातील ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ऊस जळाल्याची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. तर थोड्याच वेळात बिद्री साखर कारखान्याचा अग्निशमन बंब आला आणि पाण्याचा मारा करत सर्व आग विझवली. दरम्यान महावितरणच्या शाखा अभियंता ममता पाटील यांनी येऊन घटनास्थळी पाहणी केली. विद्युत तारेवर पक्षी बसून स्पार्क होऊन ही घटना घडली असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
या परिसरात काही विद्युत पोल वाकले आहेत त्यामुळे विद्युत वाहिन्या खाली आल्या आहेत त्याची दुरुस्ती करण्यासाठी मार्च महिन्यात वीज वितरण कार्यालयाकडे अर्ज केला होता मात्र. दुर्लक्ष केलेने ही घटना घडली असल्याचा आरोप राजेंद्र मगदूम यांनी केला. विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. गेल्या दोन वर्षापासून कोरणाचं संकट घोंगावत असताना शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशातच या शेतकऱ्यांचं ऊस जळून नुकसान झाले आता त्यांनी पीक कर्ज कसे फेडायचे मुलांचं शिक्षण कसं करायचं आणि पोटाला काय खायचं असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.









