जिल्हा परिषदेत आज पुरस्काराचे वितरण, 13 गावांना तालुकास्तरीय पुरस्कार
प्रतिनिधी / कोल्हापूर
हातकणंगले तालुक्यातील नरंदे व कागल तालुक्यातील पिराचीवाडी गावांना आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर करण्यात आला. जिह्यातील दोन्ही गावांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तर तालुकास्तरीय सुंदर गाव योजनेमध्ये 12 तालुक्यातून 13 गावांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी (16 फेब्रुवारी) सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहामध्ये सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
स्मार्ट ग्राम योजनेस आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना असे नाव देऊन राज्यशासनाने 20 मार्च 2020 पासून योजना सुरु केली आहे. सदर योजनेअंतर्गत लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखणे, समृद्ध ग्राम निर्माण करणे व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या ग्रामस्तरीय योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. निकषाच्या आधारे गुणांकन व पारदर्शकता ठेवून ग्रामपंचायतीची निवड करण्यात येते. त्यानुसार जिल्हा स्तरावर `आर.आर.पाटील सुंदर गाव’ म्हणून पिराचीवाडी व नरंदे या दोन गावांची निवड करण्यात आली आहे.
तर तालुका स्तरावर वेळवट्टी (आजरा), पिंपळगाव (भुदरगड), लकीकट्टे (चंदगड) निवडे (गगनबावडा), करंबळी (गडहिंग्लज), मिणचे व संभापूर (हातकणंगले), बहिरेश्वर (करवीर), मुगळी (कागल), वेखंडवाडी (पन्हाळा), कुंभारवाडी (राधानगरी), कोतोली (शाहूवाडी), शिवनाकवाडी (शिरोळ) या तेरा गावांची निवड झाली आहे.
कार्यक्रमास खासदार संभाजीराजे छत्रपती, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार अरूण लाड, जयंत आसगावकर, डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे, पी.एन.पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंद्रकांत जाधव व राजू (बाबा) आवळे, ऋतुराज पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रविण यादव, महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील व समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.









