स्थानिक नागरिकांना सुधारित-निरोगी जीवनशैली उपलब्ध करून देण्याचा उद्देश : आरोग्यमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर 438 ‘नम्म क्लिनिक’ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. या दवाखान्यांचा उद्देश शहरातील नागरिकांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे व आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे हा आहे. ‘नम्म क्लिनिक’चा उद्देश स्थानिक नागरिकांना सुधारित व निरोगी जीवनशैली उपलब्ध करून देणे हा आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
प्रारंभी बेंगळूरमधील 243 वॉर्डांमध्ये ‘नम्म क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहेत. उरलेली 195 केंदे हळूहळू राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये चालू केली जातील. यामध्ये एक योग केंद्र असेल. फोनवर आरोग्य समस्यांवर सल्ला देण्यात येईल. तसेच बीपी, मधुमेह यासारख्या रुग्णांची नियमित तपासणी करण्यात येईल. प्रत्येक केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व दोन मदतनीस नियुक्त केले जातील, अशी माहिती बीबीएमपीचे आरोग्य अधिकारी डॉ. के. व्ही. त्रिलोकचंद्र यांनी दिली.
काही तज्ञांकडून उपक्रमाचे कौतुक तर काहींकडून टीका
काही तज्ञांनी या उपक्रमांचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी 60 टक्के दवाखाने बेंगळूरला व 40 टक्के इतर शहरांना दिले आहेत. क्लिनिकचे समप्रमाणात वाटत केलेले नाही, असे अझीम प्रेमजी, विद्यापीठाचे शिक्षक डॉ. ई. प्रेमदास पिंटो यांनी सांगितले. जर सिंहाचा वाटा बेंगळूरला दिला तर हे समान वाटप नाही. अशा केंद्रांवर महिला आरोग्यावर लक्ष केंद्रीत केलेले नाही. तेथे स्कॅनिंगची सुविधा पण नाही. नुसतेच केंद्र चालू करण्यापेक्षा ते बळकट करण्यावर भर दिला पाहिजे. या केंद्रांवर कर्मचारी वर्ग कोठून आणणार? असे प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले.









