सेन्सेक्स 304 तर निफ्टी 69 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी सेन्सेक्स नफा वसुलीच्या प्रभावात जवळपास 304 अंकांनी नुकसानीत राहिला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी चलन व पुरवठय़ासंबंधी चिंतेत मोठय़ा प्रमाणात नफा वसूली केल्याने बाजारात सेन्सेक्स गडगडल्याचे दिसून आले आहे.
बुधवारी सकाळच्या सत्रात बाजारात मजबूत सुरुवात राहिली होती. मात्र दिवसअखेर शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 304.48 अंकांनी घसरुन 57,684.82 वर बंद झाला आहे. दरम्यान ट्रेडिंगच्या दरम्यान काही वेळ सेन्सेक्स 420.71 अंकांवर नुकसानीत राहिला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 69.85 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,245.65 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये एचडीएफसी सर्वाधिक 2.36 टक्क्यांनी घसरणीत राहिली आहे. यासोबतच कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, मारुती सुझुकी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि एशियन पेंट्स यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये डॉ.रेड्डीज लॅब, टाटा स्टील, आयटीसी आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवर घडणाऱया घटनांसोबत देशातील विविध बाबीचा विचार करता बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. यामध्ये चलनातील दबाव व त्यामुळे निर्माण झालेल्या चढउताराच्या प्रवासात भारतीय बाजार नुकसानीसह बंद झाला असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले.
दुसऱया बाजूला कच्च्या मालाचे वाढत जाणारे भाव व त्यामुळे सलगची होणारी किमतीमधील वृद्धी तसेच जगभरात वाढत जाणाऱया कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्णांमुळे नरमाईचा सूर शेअर बाजारात होता. जागतिक बाजारात जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी व चीनचा शांघाय हे बाजार तेजीत राहिले.








