वृत्तसंस्था/ मेलबर्न
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील मरे रिव्हर 250 दर्जाच्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतून स्पेनच्या माजी टॉप सीडेड राफेल नदालने पाठदुखीमुळे माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला आता पाच दिवस बाकी असल्याने नदाल या स्पर्धेपूर्वी पूर्ण तंदुरूस्त होईल, असे वाटते.
या स्पर्धेत नदालचा मंगळवारी स्पेनच्या मिनॉरबरोबर दुसरा सामना खेळविला जाणार होता. पण शेवटच्याक्षणी नदालने या स्पर्धेतून आपण दुखापतीमुळे माघार घेत असल्याची घोषणा केली. स्पेनचा नदाल आणि स्वीसचा फेडरर यांनी आतापर्यंत आपल्या वयैक्तिक टेनिस कारकीर्दीत प्रत्येकी 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. गेल्यावर्षी नदालने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकून फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली. गेल्या शुक्रवारी झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात नदालने ऑस्ट्रीयाच्या थिएमचा पराभव केला होता.









