प्रतिनिधी/ सातारा
तांत्रिक कारणास्तव श्री. छ. प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाची पंचवार्षिक निवडणूक थांबवली होती. ती निवडणूक रविवारी झाली. रविवारी सकाळी नगरवाचनालयासाठी मतदारांनी मतदानाकरता रांगा लावल्या होत्या. प्रस्थापित पॅनेल विरुद्ध विद्रोही विचाराचे कार्यकर्ते विजय मांडके यांचे पॅनेल अशी निवडणूक झाली. सर्वच इच्छूक उमेदवार मतदानांसाठी आलेल्या मतदारांना आपल्यालाच मतदान करा असे सांगताना दिसत होते. यावेळी एकुण 637 जणांची मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
श्री. छ. प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाची पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान रविवारी सकाळपासून मतदान केंद्रावर सुरु झाले. मतदारांनी सकाळपासून मतदानास रांगा लावल्या होत्या. दुपारपर्यंत रांगा होत्या. सभासद आर्वजून मतदानाकरता येत होते. साहित्यिक, वाचक यांनी येथे आर्वजून हजेरी लावली होती. त्यामध्ये किशोर बेडकिहाळ, डॉ. राजेंद्र माने, श्रीरंग काटेकर, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी मतदान केंद्रावर होती. तर उमेदवार म्हणून सत्ताधारी पॅनेलचे अनंत जोशी, विजय पंडित, डॉ. संदीप श्रोत्री, ऍड. सचिन तिरोडकर, श्याम बडवे, विजयकुमार क्षीरसागर, वैदेही कुलकर्णी, ज्योत्स्ना कोल्हटकर, प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र माने, प्रकाश शिंदे, रवींद्र झुटींग तर विरोधी पॅनेलचे विजय मांडके, मधूसुदन पत्की, अमित द्रवीड, श्रीनिवास वारुंजीकर हे उमेदवार मतदान केंद्रावर मतदारांना आपल्यालाच मतदान करा असे सांगत होते. सत्ताधाऱयांचे गुलाब फुल हे चिन्ह तर विरोधकांची वेगवेगळी चिन्हे होती. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरू होती.









