प्रतिनिधी/ वाई
शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शहर प्रशासनासोबत सदस्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून पाहणी केली. शासनाचे निर्देशाप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवांशिवाय इतर आस्थापना चालू नसलेची खात्री करत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांचे समवेत उपाध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, प्रदिप चोरगे, दिपक ओसवाल, भारत खामकर या सदस्यांनी कार्यालय अधिक्षक नारायण गोसावी, बांधकाम अभियंता सचिन धेंडे, कर निरिक्षक अभिजीत ढाणे यांच्या पथकासह शहरात प्रत्यक्ष बाजारपेठत जाऊन सुचना केल्या. अत्यावश्यक सेवेतील दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांनी कोव्हीड – 19 चाचणी व लसीकरण केले आहे का? याची विचारणा करुन नसल्यास संबंधितांची दुकाने बंद करण्याची सुचना देण्यात आल्या. तसेच येत्या दोन दिवस अशाप्रकारे सर्वेक्षण करुन जर निर्देशनांचे पालन न करता दुकाने उघडलेली आढळल्यास सर्व बाजारपेठ नाईलाजास्तव बंद करावी लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे. तसेच कोव्हिड मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेचीदेखील पाहणी करण्यात आली.
अंत्यसंस्कार करणेसाठी एकाचवेळी जास्त मृतदेह येत असल्याने रविवार पेठ येथील उपलब्ध असलेल्या व्यवस्थेत वाढ करण्यात आले असून पूर्वीच्या दोन शवदाहिनी ऐवजी आता त्यांची संख्या चार करण्यात आली आहे.
दिनांक 15/04/2021 रोजी कोरोना प्रतिबंधनात्मक उपाययोजनांबाबत घेण्यात आलेल्या ऑनलाईन मिटिंगमधील सुचनेनुसार शहरात चालू असलेल्या कामकाजावर देखरेख ठेवण्याकरिता नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती नगरपालिका प्रशासनातर्फे नेमण्यात आलेल्या विविध पथकामार्फत चालू असणा-या कोरोनाबाधित रुग्णांची हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींची यादी तयार करणे व त्यांची कोरोनाचाचणी करणे , शहरात चालू असणा-या कोरोना लसीकरणांवर देखरेख ठेवणे ,कोरोनाबाधित
रुग्णांना मिळणारा औषधोपचार तसेच गृहविलगीकरणांतील रुग्णांच्या दैनिक तपासणी याबाबत विविध यंत्रणामधील समन्वय राखणे ,प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेले शिघ्न प्रतिसाद पथकांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रातील नियमांचे पालन होणेसाठी देखरेख ठेवणे, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कारसाठी व्यवस्था करणे या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणार आहे.
शहरातील काही भागांत जास्त रुग्ण वाढत असल्याने असे कन्टेंटमेंट झोनमध्ये पूर्णपणे नागरिकांच्या हालचाली बंद करण्यात आले आहे. त्याची पाहणी करुन तेथील नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व किराणा व अत्यावश्यक सुविधा घरपोच देणेबाबत सबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे नागरिकांनी आपल्या जवळच्या दुकानदारांशी संपर्क साधून घरपोच सुविधांचा लाभ घ्यावा व अनावश्यक फिरणे टाळावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. विविध भागातील होमआयसोलेशन मधील लोकांना नगरपालिकेच्या स्वंतत्र टिममार्फत फोनकॉल करून त्यांची विचारपूस करण्याचे काम केले जात आहे. उदयापासून या टिमद्ववारे या सर्व रुग्णांना थेट झूम मिटिंग द्ववारे सर्व सदस्य ,प्रशासन आणि डॉक्टर यांच्यासोबत थेट संपर्काची सुविधा करून दिली जात आहे. या माध्यमांतून त्याचे कौन्सिलींग करण्याची कल्पना राबविणारी वाई ही पहिलीच नगरपालिका ठरत आहे.








