बानुगडे-पाटील यांनी दिले शिवसैनिकांना आदेश
प्रतिनिधी / सातारा :
सातारा पालिकेची निवडणूक ताकदीने लढवण्यासाठी शहरातील शिवसैनिकांनी तयारीला लागा. मातोश्रीवरुन जसा आदेश येईल तशी आपण सातारा पालिकेची निवडणूक जिंकून आणण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे, असे स्पष्ट आदेश शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिले.
देवज्ञ मंगल कार्यालयात शिवसेनेच्या सातारा शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुका प्रमुख आतिष ननावरे, सातारा शहर प्रमुख नीलेश मोरे, रुपाली लेंभे यांच्यासह शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी शहरातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
त्यानंतर बोलताना बानुगडे-पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. आपले मुख्यमंत्री आहेत. आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. आपले राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. आपल्याला ज्या अडचणी येतील, त्या सोडविण्यासाठी हे सरकार कटीबद्द आहे. सातारा शहरातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे शिवसेना उभी राहण्यासाठी तत्पर आहे. कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल. कार्यकर्त्यांनी आपल्या वॉर्डातील, प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला पाहिजे. येवू घातलेल्या पालिकेच्या निवडणूकीमध्ये शिवसेना ताकदीने निवडणूक लढवण्यासाठी सातारा शहरातील शिवसैनिकांनी तयारीला लागले पाहिजे. मातोश्रीवरुन जो काय आदेश येईल त्या आदेशानुसार सातारा नगरपालिकेत शिवसेना निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे शहरातील शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे त्यांनी आदेश दिले.









