छत्तीसगडमधील घटना-आयईडी स्फोटात अनेक जण जखमी
वृत्तसंस्था / नारायणपूर
छत्तीसगडच्या नक्षलवादग्रस्त नारायणपूर जिल्हय़ात मंगळवरी नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या बसला आयईडी स्फोट घडवून आणत लक्ष्य केले आहे. या बसमधून डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे 24 जवान प्रवास करत होते. या हल्ल्यात 4 जवान हुतात्मा झाले आहेत. तर 6 हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत.
धौडाई आणि पल्लेनार यादरम्यानच्या घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला आहे. या हल्ल्यात डीआरजीचे तीन जवान तर एक पोलीस जवान हुतात्मा झाल्याची माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली आहे.
सुरक्षा दलांच्या जवानांना नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते. मोहिमेतून परतताना ते बसमधून प्रवास करत होते. कडेमेटा आणि कन्हरगावादरम्यान बस पोहोचली असता नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाद्वारे स्फोट घडवून आणला असल्याचे पोलीस महासंचालक डी.एम. अवस्थी यांनी सांगितले आहे.
नक्षली हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांबद्दल छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उइके यांनी दुःख व्यक्त केले आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांनी जखमी जवान लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.









