कोरोनाच्या दुसऱया लाटेचे सावट, अमेरिकेतील आर्थिक पॅकेजची मावळलेली शक्यता, भारतातही दुसऱया पॅकेजबाबत झालेली निराशा, पतमानांकन कंपन्यांकडून वर्तवले जाणारे अंदाज आणि अमेरिकन निवडणुकांबाबतचे बदलते चित्र या सर्व गोष्टी शेअर बाजारातील हेलकावे वाढवणाऱया आहेत. या नकारात्मक बाबी एका पारडय़ात असताना दुसऱया पारडय़ात फारसे भरीव काहीही नाही. देशांतर्गत अर्थव्यवस्था रुळावर येत असली तरी तिने अपेक्षित वेग पकडलेला नाही. त्यामुळे बाजारात ‘बच के तू रहना रे…’ भूमिकेतच गुंतवणूकदारांना राहावे लागेल.
सरत्या आठवडय़ात शेअर बाजारात नफावसुलीकडे गुंतवणूकदारांचा अधिक कल दिसून आला असला तरी शुक्रवारी सप्ताहसांगतेच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 254 अंकांनी वाढून 39,982 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही 82 अंकांनी वधारुन 11,762 वर बंद झाला. गुरुवारी शेअर बाजाराचे निर्देशांक 2.5 टक्क्यांनी कोसळले होते. यामध्ये प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. शुक्रवारी या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने निर्देशांकाला आधार मिळाला.
सध्या शेअर बाजारावर अमेरिकन निवडणुका आणि कोरोनाची दुसरी लाट या दोन्ही गोष्टींचा प्रभाव अधिक दिसत आहे. वास्तविक, भारतात कोरोना संक्रमणाचा आणि मृत्यूचा दर कमी होत असताना युरोपियन देशांत तो वाढत आहे. त्यातूनच पुन्हा टाळेबंदीच्या शक्यता वर्तवल्या जात असल्याने युरोपियन शेअर बाजारात पडझड दिसत आहे. अमेरिकेमध्ये प्रोत्साहन पॅकेजची घोषणा अद्याप झालेली नसल्याने त्याचेही नकारात्मक परिणाम बाजारावर दिसत आहेत. विविध देशांच्या अर्थव्यवस्थांवर कोरोनाचे परिणाम होण्याच्या शक्यता असल्याने नफावसुलीला उधाण आले आहे.
चालू आठवडय़ात उपरोक्त घटनांचा परिणाम दिसून येणार असला तरी इतर काही घटक बाजारातील समभागांमध्ये चढउतार निर्माण करणारे ठरु शकतात. केंद्र सरकारने चीनमधून आयात केल्या जाणाऱया एअर कंडिशनरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. रेफ्रिजरेटर्ससोबत एअर कंडिशनर आयात करण्याच्या धोरणात सुधारणा करण्यात आली असून ती मुक्त धोरणातून हटवून प्रतिबंधात्मक सूचीत टाकण्यात आली आहे. परिणामी, चालू आठवडय़ात व्होल्टास, एसआरएफ, हॅवेल्स, ब्ल्यूस्टार या कंपन्यांच्या समभागात निश्चित तेजी दिसून येईल.
जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिव्हीर हे कोरोनाग्रस्तांना दिले जाणारे औषध फारसे प्रभावी नसल्याचे एका सर्वेक्षणाचा दाखला देत म्हटले होते. यामुळे ग्लेनमार्क, सिप्ला, डॉ. रेड्डीज, कॅडेला हेल्थकेअर, ज्युबिया या कंपन्यांचे समभाग घसरण्याची शक्यता वर्तवली जात होती; पण भारतीय डॉक्टरांनी डब्ल्यूएचओच्या दाव्यानंतरही हे औषध दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. किंबहुना, कॅडिलाचा समभाग शुक्रवारी 3.4 टक्क्यांनी वाढलेला दिसला. अन्य कंपन्यांचे समभागही वधारलेले दिसले. कोरोना संकटाचे सावट कायम असल्याने या कंपन्यांच्या समभागांची खरेदी योग्य वेळी करणे निश्चित फायद्याचे ठरेल.
याखेरीज एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया, बजाज, डीमार्ट या कंपन्यांच्या तिमाही निकालांवरही नजर ठेवून राहणे गरजेचे आहे. डीमार्टच्या नफ्यात 38.39 टक्क्यांची घट झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. वाहननिर्मिती कंपन्या सध्या सातत्याने विक्रीतील वाढ दर्शवत आहेत. आगामी दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या समभागांची खरेदी फायदा देऊन जाणारी ठरेल. डॉ. रेड्डीज कंपनीला रशियाच्या स्फुटनिक लसीच्या भारतातील चाचणीला परवानगी मिळाली आहे. टाटा पॉवरला गुजरात ऊर्जाविकास निगमकडून धोलेरा सोलर पार्कमध्ये 100 मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे कंत्राट मिळाले आहे.
चालू आठवडय़ात मिडकॅप शेअर्समध्ये येणाऱया एक-दोन आठवडय़ांमध्ये तेजी पहायला मिळू शकते. कारण या समभागांचे मूल्य आधार पातळीपर्यंत आलेले आहे. याखेरीज या आठवडय़ातही औषधनिर्मिती कंपन्या, धातू कंपन्या आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांवरच जास्त भर देणे फायद्याचे ठरेल. इन्फोसिस, विप्रो, डॉ. रेड्डी, टीसीएस, टाटा मोटर्स, जिंदाल स्टील, कॅडिला, सिप्ला यांच्या समभागांचे मूल्य कमी झाल्यास त्यांची खरेदी करुन ठेवता येईल. जेट एअरवेज, सिंटेक्स इंडस्ट्रीज, गायत्री प्रोजेक्टस, टाटा स्टील लाँग प्रॉडक्टस, यामिनी इनव्हेस्टमेंट या कंपन्यांच्या समभागात बाजारात मंदी असूनही तेजी दिसून आली आहे. त्यामुळे या समभागांचा समावेशही आपल्या पोर्टफोलिओमध्ये करता येईल. याखेरीज मायथन अलॉईजचा समभाग पुढील 6 ते 8 महिन्याचा दीर्घकाळाचा विचार करता पोर्टफोलियोमध्ये असायलाच हवा. या आठवडय़ात निफ्टीने 11850 चा टप्पा पार केला तर बाजारात तेजीचे मोठे पर्व सुरु होऊ शकते.
चालू आठवडय़ात शेअर बाजारात कमाईसाठीची आणखी एक आयपीओरुपी संधी चालून येणार आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये आलेल्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना बक्कळ नफा मिळवण्याची संधी दिली. हॅप्पीएस्ट माइंडस्पासून माझगांव डॉकपर्यंतच्या सर्व आयपीओंनी जबरदस्त परतावा दिला. आता 20 आक्टोबर रोजी चालू वर्षांतील 12 वा आयपीओ बाजारात येत आहे. हा आयपीओ आहे स्मॉल फायनान्स बँकेचा. या आयपीओच्या माध्यमातून बँकेला 280 कोटी रुपये जमा करायचे आहेत. आयपीओची प्राईस बँड व्हॅल्यू 32-33 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. ही संधीही गुंतवणूकदारांनी सोडता कामा नये अशी आहे.
एकंदरीत, शेअर बाजारात सध्या नकारात्मकतेचे ढग दिसून येत आहेत. मात्र प्रत्येक पडझडीच्या काळातही काही समभागांमध्ये तेजी दिसून येत असते. त्यांचा अविरत शोध घेत राहणे गरजेचे असते. त्यासाठी घडामोडींवर लक्ष ठेवून सतत निरीक्षण करत राहणे आवश्यक आहे.
– संदीप पाटील









