अर्थव्यवस्थेत सुधाराचे संकेत -मूडीजने बदलले भारताचे सॉवरिन रेटिंग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अर्थव्यवस्थेप्रकरणी भारताला मंगळवारी मोठी सुखद बातमी मिळाली आहे. मूडीज या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताचे सॉवरिन रेटिंग ‘नकारात्मक’ (निगेटिव्ह) वरून बदलत ‘स्थिर’ केले आहे. याचबरोबर भारताचे पतमानांकन बीएए3 वर कायम आहे.
यापूर्वी मूडीजने मे महिन्यादरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दलचे मानांकन निगेटिव्ह बीएए3 केले होते. आर्थिक विकासाच्या मार्गातील अडचणी, अधिक कर्ज आणि कमजोर वित्ती प्रणालीचा पतप्रतिष्ठेवर प्रभाव पडत असल्याचे मूडीजने तेव्हा म्हटले होते.
अमेरिकेतील या पतमानांकन संस्थेने फेब्रुवारीत 2021-22 साठी भारताचा आर्थिक विकास दर 13.7 टक्के राहण्याचे अनुमान व्यक्त केले होते. अधिकृत अनुमानानुसार 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 8 टक्क्यांची घसरण झाली होती.
आर्थिक स्थितीत सुधारासाठी अर्थव्यवस्था आणि वित्तीय प्रणालीत घसरणीच्या जोखिमीत घट झाल्याचा दाखला मूडीजने दिला आहे. आम्ही भारताच्या आर्थिक स्थितीबद्दलच्या अनुमानात बदल केला असून ते निगेटिव्ह पासून स्थिर शेणीत केले असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
उत्तम प्रमाणातील भांडवल आणि रोख तरलतेच्या चांगल्या स्थितीमुळे बँक आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांच्या स्तरावर जोखीम पूर्वीच्या अनुमानाच्या तुलनेत कमी झाली आहे. अधिक कर्ज भार अणि कर्ज पेलण्याच्या कमजोर स्थितीमुळे जोखीम कायम आहे. पण आर्थिक चित्र पुढील काही वर्षांमध्ये केंद्र तसेच राज्य सरकारांची राजकोषीय तूट हळूहळू कमी करण्यास सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा आहे. यामुळे सरकारवरील विश्वास कायम राखता येणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
तत्पूर्वी मागील महिन्यात भारताच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सॉवरिन रेटिंग आउटलुकमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कंबर कसली होती. भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी मूडीज संस्थेच्या प्रतिनिधींची भेट घेत भारताच्या आर्थिक विकासाच्या शक्यतेबद्दल चर्चा केली होती.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकासदर 20.1 टक्के राहिला होता. केंद्र सरकार राजकोषीय तूट मागील वर्षाच्या 9.3 टक्क्यांच्या तुलनेत 6.8 टक्के राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सनी भारताच्या सॉवरिन रेटिंगमध्ये पुढील दोन वर्षांमध्ये कुठलाच बदल होणार नसल्याची भूमिका मांडली आहे.









