संजीव खाडे / कोल्हापूर
शहरात मटणदरावरून सुरू असलेला संघर्ष संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. मटण दुकानदार 560 रूपये किलो दराने मटण विक्री करण्यावर ठाम आहेत. तर या संघर्षात कार्यरत असलेल्या कृती समितीने दरवाढीला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन्ही बाजूचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मटणदरावाढीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र दुकाने बंद राहल्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. गेली नऊ दिवस शहरातील 154 मटण दुकाने पूर्णपणे बंद राहिल्याने तब्बल अडीच कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्याचबरोबर 154 दुकानदार आणि त्यांच्या दुकानांत कामाला असणारे प्रत्येकी 2 काम अशा सुमारे 362 कुटुंबांवर परिणाम झाला असून ग्राहकांबरोबरच मांसाहारी हॉटेलवरही परिणाम जाणवत आहे.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये शहरात मटणदरवाढीला विरोध सुरू झाला. कसबा बावडय़ात पहिल्यांदा मटणदरावाढीच्या विरोधात ठिणगी पडली. आंदोलन झाले. त्याचे लोण शहरात पसरले. शिवाजी पेठेतील बैठकीत 480 रूपये दर निश्चित झाला, पण त्यानंतर खाटीक बांधवांनी हा दर परवडत नसल्याची भूमिका घेतली. त्यातून मटणदरवाढ विरोधी कृती समिती आणि मटणदुकानदार यांच्या संघर्ष सुरू झाला. 31 डिसेंबर रोजी वादाचे प्रसंग घडले. त्यानंतर मटण दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय खाटीक बांधवांनी घेतला. तेंव्हापासून गेली नऊ दिवस बंद सुरू आहे.
शहर आणि उपनगरातील मिळून एकूण 154 दुकानांत मटण विक्री पूर्णपणे बंद आहे. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहे. शहरात दररोज सुमारे सरासरी 25 ते 30 लाख रूपयांच्या मटणाची विक्री होते. त्यामध्ये बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी मटणाची सर्वाधिक विक्री होते. रविवारी हे प्रमाणात इतर सर्व वारांच्या तुलनेत सर्वाधिक असते. गेल्या नऊ दिवसांत बंदमुळे सुमारे अडीच कोटी रूपयांची उलाढाल ठप्प आहे. त्याचा परिणाम मटणदुकानदारांसह त्यांच्यात कामाला असणाऱया कामगारांच्या कुटुंबीयांवरही झाला आहे. त्याचबरोबर शहरातील नागरिकांनाही नेहमीच्या ठिकाणी मटण मिळत नसल्याने त्यांनाही ग्रामीण भागात जावे लागत आहे. शहरातील हॉटेल्सचीही अवस्था काहीशी तशीच आहे. त्यामुळे मटणदराचा वाद आता संघर्ष बनला असला तरी तो संपविण्याची मागणी होत आहे.
मटणमार्केटमध्ये धरणे आंदोलन
मटणदुकानदारांनी मटणमार्केटमध्ये आपली दुकाने बंद ठेवून धरणे आंदोलन सुरू केले आहे. तेथे उभारण्यात आलेल्या मंडपात सर्व मटणविक्रेते, दुकानदार धरण्याला बसत आहेत.
तोडगा काढण्याकडे राजकीय नेत्यांच्या पाठ
मटणदरवाढीवर तोडगा काढण्यासाठी राजकीय नेतृत्वाने पुढे येण्याची गरज आहे. पण थेट नागरिकांशी संबंधित हा आर्थिक विषय असल्याने कुणीही राजकीय नेता या वादात थेट भूमिका घेताना दिसत नाही.
दर्जेदार, उत्तम मटण विक्री करताना 560 हा दरच योग्य आहे. त्यापेक्षा कमी दराने मटण विक्री करणे परवडत नाही. जनतेने ही भूमिका समजावून घेऊन मटणदुकानदारांना या संघर्षात साथ द्यावी.
महेश घोडके, माजी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा खाटीक समाज









