पेढे दुर्घटनेत दरड कोसळून तिघांचे मृत्यू प्रकरण
चिपळूण
तालुक्यातील पेढे-कुंभारवाडी येथे गतवर्षी झालेल्या 22 जुलै रोजी अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेस मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱया कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या संचालकांसह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱयांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱयांसह राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी व शाखा अभियंता अशा 9 जणांवर रविवारी चिपळूण पोलीस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अशा स्वरुपातील गुन्हा दाखल करण्यासाठीचा मागणी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड. ओवेस पेचकर यांनी येथील न्यायदंडाधिकाऱयांकडे केला होता. यामळे ऍड. पेचकर यांच्या न्यायालयीन लढय़ाला मोठे यश पहिल्याच टप्प्यात मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत बांगर, शाखा अभियंता अमोल मांडकर, ठेकेदार कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे तत्कालीन अधिकारी, संचालक राजेश गर्ग, अमितकुमार गर्ग, टिकमचंद गर्ग, अंकित दिनेश चौरसिया, विवेक गोयल, ज्योती सोनी अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱयांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद शशिकांत महादेव मांडवकर (66 पेढे-पुंभारवाडी) यांनी दिली होती.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम परशुराम घाटात सुरु असताना तेथील कामाचे नियोजन पाहणारे राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत बांगर व शाखा अभियंता अमोल मांडकर व संबंधित ठेकेदार यांनी निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने पाण्याचा निचरा होणाऱया 5 मोऱया बंद करुन ते पाणी जाण्यासाठी पर्यायी सोय केली नाही. त्यामुळे परशुराम घाटातील रस्त्याच्या सर्व मोऱयांचे पाणी हे डोंगर भागातून मोठय़ा लेंढय़ाच्या स्वरुपात पेढे-कुंभारवाडी येथील पायथ्याशी असलेल्या या वाडीत येताच दरड कोसळून या वाडीतील अर्चना (सावित्री) हरिश्चंद्र मांडवकर, आरोही अविनाश मांडवकर, आरुषी अविनाश मांडवकर यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर सुप्रिया शशिकांत मांडवकर या जखमी झाल्या होत्या. तसेच अविनाश मांडवकर, राजश्री मांडवकर, एकनाथ मांडवकर, दत्तात्रय मांडवकर, मनोहर नरळकर, विलास नरळकर यांची घरे जमीनदोस्त झाली होती.
या दुर्घटनेस संबंधित ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी सुरुवातीपासूनच पेढे ग्रामस्थांसह शशिकांत मांडवकर यांनी पोलीस अधिकाऱयांसह प्रांताधिकाऱयांकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रांताधिकाऱयांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱयांना फेरचौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी चिपळूणचे सुपुत्र व उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने चिपळूण न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याची गंभीरपणे दखल घेत पोलीस स्थानकात तिघांच्या मृत्यूची नोंद असताना कसलीच कार्यवाही का झाली नाही, असा सवाल पोलिसांना विचारला. त्यांनतर अखेर पोलिसांनी दरड दुर्घटनाप्रकरणी रविवारी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.









