डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा अवमान प्रकरण
नंदगड / वार्ताहर
नंदगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळय़ाची विटंबना केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. त्यामुळे नंदगड परिसरात संतापाची लाट निर्माण झाली होती. त्यानिमित्त शुक्रवारी विविध दलित संघटना व नंदगड ग्रामस्थांच्यावतीने नंदगड गावात भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाचा अवमान केलेला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
नंदगड येथील हलशी कत्रीजवळील एका जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला आहे. सदर जागा मुख्य रस्त्यापासून जवळच आहे. गुरुवारी सायंकाळी काहीजण या पुतळय़ाकडे गेले असता पुतळय़ाची विटंबना केल्याचे दिसून आले.
शुक्रवारी सकाळी विविध संघटनांच्यावतीने सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर तेथून नंदगड गावातील विविध प्रमुख गल्ल्यांतून मोर्चा निघाला. दुपारी हा मोर्चा गावभर फिरून पुतळय़ाच्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी सभा झाली आणि या सभेत दलित संघटनेचे नेते प्रकाश मादार, शरद होन्ननायक, परशराम मादार, गुंडू तळवार, जि. पं. सदस्य जितेंद्र मादर, भाजपचे नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल, विठ्ठल पाटील, म. ए. समितीचे राजू पाटील, शंकर सोनोळी, इब्राहिम तहसीलदार यांनी आपले विचार व्यक्त केले.
या ठिकाणी खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालीकोटी उपस्थित होत्या. विविध दलित संघटनांच्यावतीने मागणीचे निवेदन तहसीलदारांना यावेळी सादर करण्यात आले. या प्रकरणी अवमान केलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना दिले.
नंदगड बाजारपेठ पूर्ण बंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा अवमान प्रकरणाचा निषेध करण्यासाठी नंदगडमधील सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने दिवसभर या परिसरात शुकशुकाट पसरला होता. या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या अज्ञात समाजकंटकांचा शोध लावून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणीही नंदगडमधील सर्व व्यावसायिकांनी केली आहे..









