लंडनच्या विख्यात ‘नॅचरल हिस्टरी म्युझिअम’च्या पायऱया चढता चढता सुप्रसिद्ध अभिनेते-लेखक ‘स्टिव्हन जॉन फ्राय’ शिक्षकांच्या महत्तेविषयी सांगत होते. शिक्षकी पेशाचा आणि शिक्षकांचा गौरव होणे का गरजेचे आहे यावरही भाष्य करीत होते. ‘शिक्षकी पेशा हा अनेक क्षेत्र-व्यवसायांची आधारशिळा आहे’, हे त्यांचे प्रतिपादन विशेष भावणारे. त्यांच्याच मार्फंत शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’ समजल्या जाणाऱया ‘ग्लोबल टीचर्स अवार्ड’ पारितोषिक विजेत्याचे नाव जाहीर झाले (3 डिसेंबर). लंडनच्या महापौरांचे स्वागताचे भाषण, युनेस्को कार्यक्रम अधिकाऱयांचे प्रास्ताविक, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या शुभेच्छा, प्रसन्न वृत्तीच्या स्टिव्हनचे नेटके संचलन आणि कार्यक्रमाचे जागतिक प्रसारण यावरूनच पुरस्काराची गुणवत्ता लक्षात येण्याजोगी. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आणि रक्कम तब्बल सात कोटी रु. पुरस्कार निवडीची पद्धत ‘नोबेल’ पुरस्कारासारखीच. जगभरातल्या 140 देशांमधून आवेदन आणि नामांकनामार्फत पहिल्या फेरीत 12,000, दुसऱया चाळणीत 50 आणि अंतिम दहामधून एका नावाच्या घोषणेचा अंतिम क्षण.
संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये ‘जेम्स’ नावाची एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. स्थापना 1959 मधील. जगभरातल्या 175 देशात आंतरराष्ट्रीय शिक्षण देणे आणि त्यातही ‘मेनासा’ (मिडल ईस्ट, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ एशिया) प्रांतातील 54 देशांमध्ये विशेष भर देऊन शिक्षणविषयक कार्य करणारी ही कंपनी. ‘सनी वार्की’ या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष. त्यांच्याच पुढाकारातून ‘वार्की फाऊंडेशन’ची स्थापना झालेली. युनेस्को आणि वार्की फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार दिला जातो. 2020 च्या पुरस्काराच्या अंतिम यादीत चार महिला आणि सहा पुरुष. प्रत्येकाची बांधीलकी, कार्यनि÷ा आणि तळमळ प्रेरणादायी. या दहाही जणांची ओळख आणि काम मुळातून समजून घेण्यासारखे आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे रणजितसिंह डिसले यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या कुटुंबीयांसहित आपणा सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. रणजितसिंहांचे वडील महादेव डिसलेदेखील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. बार्शीमधल्या रणजितसिंहाचे शिक्षण परिसरातील शाळा-महाविद्यालयात झाले आहे. उत्तर सोलापूरमधल्या वडाळा येथून त्यांनी शिक्षणशास्त्र विषयातील पदवी घेतली. ‘अभियांत्रिक’ होण्याची इच्छा बाळगणारे रणजितसिंह आज खऱया अर्थाने जगाने मान्य केलेले तंत्रज्ञ आणि सामाजिक उद्योजक ठरले आहेत. 3,000 रु. मानधनावर त्यांनी शिक्षण सेवक म्हणून आपल्या सेवेची सुरुवात केली. पहिल्या नोकरीचे गाव परितेवाडी. शाळेच्या जागी ‘शेळय़ा’ आणि ‘गुरा-ढोरांचा’ वाडा होता. त्यांनी गावकऱयांना शाळेत बोलावण्याऐवजी त्यांच्या घरी-शेतावर भेटायला सुरुवात केली. शाळा झाडून काढली. दारे-खिडक्मया नीट केल्या. स्वत:च्या मोटर सायकलवरून मुले शाळेत ‘आणती’ केली. वडिलांकडून पैसे घेऊन लॅपटॉप खरेदी केला. शाळेत ‘आणती’ केलेली मुले ‘टिकती’ ठेवण्यासाठी लॅपटॉपवर मुलांना सिनेमा, गाणी, ऍनिमेटेड व्हीडिओ दाखवण्यास सुरुवात केली. ‘टिकती’ झालेली मुले आता ‘शिकती’ करण्याचे आव्हान होते. ग्रामीण पालकांना रोज दुपारी दोन वा. गुरुजींच्या येणाऱया एसएमएसचे अप्रुप वाटू लागले.
शिक्षणातील आपल्या अप्रगतीचे विश्लेषण रणजितसिंह एकाच वाक्मयात करतात. त्यांच्या मते, ‘21 व्या शतकातील विद्यार्थ्यांना, आपण 20व्या शतकातील शिक्षक, 19व्या शतकातील अभ्यासक्रम, 18व्या शतकातील शिक्षण पद्धतीने शिकवतो’. 21व्या शतकातील मुले ही स्मार्ट फोन हाताळतच मोठी होत आहेत. त्यांना कार्टून, ऍनिमेटेड व्हीडिओ, दृक्-श्राव्य गोष्टी पहायला आवडतात. शिवाजी महाराजांचे किल्ले, अंटार्क्टिकामधील पेंग्विन पक्षी, मानवी अन्न पचनाची क्रिया या ऐकण्यापेक्षा पाहून अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. त्यांनी पुस्तकातील पाठानुसार रंजक, माहितीपर, समृद्ध करणारे व्हीडिओ बनविले. सर्वांच्या परिचयाचे ‘क्मयू आर’ (क्विक रिस्पॉन्स) कोड कसे बनवितात हे शिकून पुस्तकातील प्रकरणाखाली ‘क्मयू आर’ कोड चिकटवले. विद्यार्थ्यांनी पालकांकडे असलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून ‘क्मयू आर’ कोड स्कॅन केल्यानंतर मुलांना-पालकांना स्तब्ध करणारे अनुभव येऊ लागले. शिक्षण रंजक, सुलभ आणि सोपे झाले. या प्रयोगाने बार्शी तालुक्मयातील ‘खांडवी’ येथील शाळेमध्ये मूळ धरले. पाहता-पाहता शाळेमध्ये मुलींची संख्या वाढली. शाळा गळती थांबल्यामुळे मुलींच्या लग्नाची वये लांबणीवर पडली. सुदैवाने बालभारतीने म्हणजेच महाराष्ट्र शासनाने या प्रयोगाचे रुपांतरण धोरणात केले. देशानेही हा प्रयोग स्वीकारला. कोरोना संक्रमणाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी घरी बसून शिकत आहेत. त्याचे एक गमक ‘क्मयू आर’ कोडची पुस्तके आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणारे रणजितसिंह उत्तम इंग्रजी शिकले. त्यांनी जगभरात समाज माध्यमातून शैक्षणिक मित्र जमविले. स्वत:ला तांत्रिकदृष्टय़ा उत्क्रांत केले. 84 देशांमधील कल्पक शिक्षकांचा गट एकमेकांच्या शाळांना, शिक्षकांना ‘व्हर्च्युअल टूर’च्या माध्यमातून समृद्ध करीत असतो. शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या अनेक संमेलनांमध्ये स्मार्ट फोनद्वारे प्रभावी अध्ययनाचे प्रात्यक्षिक त्यांनी दिलेले आहे. मुलांचा वयोगट, शिकण्या-शिकवण्याची आवड आणि शिक्षकांची नेमकी ताकद (स्ट्रेंग्थ) जुळून आल्यास शिक्षण आनंददायी होते. प्रत्येक मूल स्वत:च्या गतीने शिकत असते. त्या गतीशी तंत्रज्ञानाद्वारे जुळवून घेतल्यास शैक्षणिक अनुभवांचे वैयक्तिकीकरण साधता येते. हा त्यांच्या प्रयोगाचा सारांश आहे.
संपूर्ण जगालाच ‘विद्यार्थी वर्ग’ मानणाऱया रणजितसिंहानी आपल्या दातृत्वाने सर्वांना जिंकले आहे. पुरस्कारातील निम्मी रक्कम त्यांनी नामांकन प्राप्त झालेल्या उर्वरित प्रयोगवीरांना वाटून टाकलेली आहे. त्यांच्या प्रयोगांना बळ मिळावे ही त्यामागील भावना. उर्वरित रकमेतील 30… त्यांच्या ‘टीचर्स इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या कामासाठी खर्च होणार आहे. ‘लेट अस क्रॉस द बॉर्डर’ नावाचा उपक्रम ते आणि त्यांचे मित्र भारत-पाकिस्तान, इस्राईल-पॅलेस्टाईन, इराक-इराण, अमेरिका आणि उत्तर कोरिया या आठ देशांमध्ये चालवतात. या उपक्रमासाठी पुरस्कारातील 20… रक्कम उपयोगात आणली जाईल. छोटय़ाशा घरात राहणाऱया रणजितसिंहांच्या गरजा मर्यादित आहेत. आपल्या वेतनाचा काही अंश ते स्वत:ला समृद्ध करण्यासाठी नेमकेपणाने करीत असतात. पुरस्काराची काही रक्कम स्वत:ला ठेवली नाही का या प्रश्नावर त्यांचे उत्तर, ‘मला मिळणाऱया पगारात मी समाधानी आहे आणि मला काही लागल्यास समाज माझ्या पाठीशी असेल. इतरजण कदाचित काही करत नसतील म्हणून मी तुम्हाला वेगळा वाटत असेन. मात्र मी तुमच्यासारखाच आहे.’ रणजितसिंहांचे काम आणि वक्तव्य आपल्याला अंतर्मुख करणारे
आहेत.
डॉ. जगदीश जाधव








