ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना आता महाराष्ट्रात आणखी एक संकट येऊन उभे राहिले आहे. राज्यातील दोन वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये महाबळेश्वरच्या एका गुहेत दोन प्रजातींची वटवाघूळ सापडले होते. या दोन प्रजातींच्या वटवाघूळांमध्ये निपाह विषाणू आढळल्याचे समोर आले असल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ने दिली आहे. याबाबत माहिती देताना डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितले की, याआधी देशात काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसात संक्रमित होतो.
निपाह हा विषाणू कोरोना व्हायरसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. केरळ राज्यात 2018 साली निपाह विषाणूमुळे झालेले मृत्यूतांडव पाहिले तर हा विषाणू किती धोकादायक आहे याचा अंदाज येईल.
निपाह विषाणू हा कोरोना व्हायरसपेक्षा भयावह असल्याचे म्हटले आहे. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 1 ते 2 टक्के लोकांचा मृत्यू होतो. कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे. मात्र निपाहची लागण झालेल्या रुग्णांमध्ये 65 टक्क्याहून अधिक मृत्यूदर असल्याचे काही देशातून समोर आले आहे. कोरोनापेक्षा अधिक मृत्यूदर हा निपाह व्हायरसचा आहे.
सगळ्यात आधी निपाह विषाणूचा संसर्ग 1998-99 मध्ये मलेशियामध्ये आढळून आला होता. डुक्कर आणि डूक्करांची काळजी घेणाऱ्यांमध्ये हा विषाणू आढळला होता. त्यावेळी 40% मृत्युदर होता. तर 2021 मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाह विषाणू आढळून आला होता. त्याचप्रमाणेच 2018-19 मध्ये आसाम राज्यात देखिल निपाहचे रुग्ण आढळून आले होते.
दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थिती निपाह सारख्या भयावह रोगाचे विषाणू सापडणे ही देशासाठी आणि प्रामुख्याने महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे.