आमदार सुदिन ढवळीकर यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
प्रतिनिधी/ पणजी
सरकार तुमच्या दारी करतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महापुरात कोसळलेली लोकांची घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न केले असते तर बरे झाले असते, असे प्रतिपादन मगो आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.
फोंडा तालुक्यातील मुर्डी खांडेपार येथे महापूरात कोसळलेल्या घराच्या बांधकामाची पायाभरणी करताना ते बोलत होते. फोंडा, डिचोली आणि वाळपई तालुक्यातील शेकडो घरे महापूरामुळे कोसळली होती. त्यातील काही घरे चक्क मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सांखळी मतदारसंघातील आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून सरकार तुमच्या दारी कार्यक्रमाच्या नावाखाली बेघरांच्या घरी जाणार का? असा सवाल उपस्थित करताना ’आधी लोकांना घरे बांधून द्या, मगच सरकार त्यांच्या ’दारी’ न्या’, असा टोलाही त्यांनी लगावला.
महापूरात कोसळलेली घरे बांधून देणे मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर आपण ती बांधून देतो, असे आव्हान श्री. ढवळीकर यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्षच केल्यामुळे स्वतः दिलेल्या आश्वासनानुसार ढवळीकर यांनी अनेकांना घरे बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा प्रारंभ करताना मुर्डी येथील घरासाठी त्यांनी पायाभरणी केली.
त्याचबरोबर गोवा भेटीवर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूरग्रस्त भागात जाऊन लोकांची परिस्थिती प्रत्यक्ष पहावी व त्यांना मदत करावी, असे आवाहन ढवळीकर यांनी केले आहे.
कार्यक्रमास त्यांच्यासोबत मगो नेते केतन भाटीकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, तसेच नगरसेवक, पंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना श्री. ढवळीकर पूरग्रस्त कुटुंबास 5 लाख रुपये मदतही दिली.









