ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईतील अनेक ठिकाणांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. त्यातच आज पुन्हा आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत नव्या पाच रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीत रुग्णांची एकूण संख्या 60 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारावीत आज नवीन पाच रुग्ण सापडले असून हे रुग्ण धारावीतील मुकुंदनगर येथील आहेत. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुकुंदनगर येथे एकूण 14 कोरोनाग्रस्त झाले आहेत. तर धारावीत आत्तपर्यंत सात जण दगावले आहेत.
दरम्यान, महापालिकेकडून धारावी भाग सील करण्यात आला आहे. तसेच या भागात निर्जंतुकीकरण, ड्रोन द्वारे नागरिकांवर नजर ठेवणे आदी उपाययोजना सुरू आहेत. मात्र तरीही नागरिकांकडून लॉक डाऊन चे म्हणावे तसे पालन होत नाही आहे.
संपूर्ण मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या 1756 झाली असून आतापर्यंत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.









