खरीफ हंगामाला सुरुवात : यंदा 210 हेक्टरमध्ये भातशेती : 70 किलो भाजी बियाण्यांचे वाटप
प्रतिनिधी /धारबांदोडा
धारबांदोडा तालुक्यात खरीफ म्हणजे पावसाळी हंगामातील शेतीला सुरुवात झाली असून विभागीय कृषी कार्यालयाने यंदा 210 हेक्टर जागेत भातशेती तर 70 ते 80 हेक्टरमध्ये भाजीपाल्याची लागवड करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. भाजी लागवडीसाठी तालुक्यातील शेतकऱयांना सुमारे 70 किलो बियाणे वितरीत करण्यात आले आहे. मागील हंगामात धारबांदोडा तालुक्यातून 294 टन भाजीचा पुरवठा फलोत्पादन महामंडळाला करण्यात आला होता. सर्वाधिक भाजी पुरवठय़ामध्ये दक्षिण गोव्यात धारबांदोडा तालुका अव्वल ठरला आहे.
गेल्या दोन वर्षांत भाजी लागवडीचा उच्चांक
मागील हंगामात तालुक्यातील शेतकऱयांनी हिरव्या मिर्चीचे मोठय़ा प्रमाणात पिक घेतले होते. साधारण 95 टन एवढी मिरची लागवड झाली होती. त्यापाठोपाठ साधारण 91 टन कॅबेज तर 66 टन भेंडीचे उत्पादन घेण्यात आले होते. मागील आठ वर्षांमध्ये तालुक्यात भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठय़ाप्रमाणात वाढ झालेली दिसून येते. धारबांदोडा तालुक्याच्या निर्मितीनंतर सन् 2012 साली याठिकाणी विभागीय कृषी कार्यालय सुरु करण्यात आले. तेव्हापासून गेल्या आठ वर्षांची आकडेवारी चढय़ा क्रमाने वाढत गेलेली दिसून येते. सन् 2012 -2013 मध्ये 2 टन, सन् 2013-2014 साली 4.2 टन, 2014-2015 साली 27.87 टन, 2015-2016 साली 32.82 टन, 2016-2017 साली 33.02 टन, 2017-2018 साली 45.3 टन, 2018-2019 मध्ये 88.33 टन तर मागील हंगामात 2019-2020 साली तब्बल 147.06 टन भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये तालुक्यात भाजी उत्पादनामध्ये उच्चांक गाठलेला आहे. त्यात विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत व त्यांच्या सहकाऱयांचा महत्त्वाचा वाटा आहे. विशेष म्हणजे फलोत्पादन महामंडळाला पुरविण्यात आलेल्या भाजी बरोबरच खुल्या बाजारात विकण्यात आलेल्या भाजीची आकडेवारी तेवढीच मोठी आहे.
विभागीय कृषी खात्याच्या प्रयत्नांना यश
धारबांदोडा तालुक्यातील शेतकऱयांनी दुबार पिक घ्यावे यासाठी कृषी अधिकारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्याचेच फलीत आज भाजी लागवडीतून दिसून येत आहे. खाण बंदीनंतर तालुक्यातील बऱयाच प्रमाणात शेतकरी आपल्या मूळ कृषी व्यवसायाकडे वळले आहेत. त्यात युवकांचा सहभागही लक्षणीय आहे. गेल्या दोन वर्षांपासून धारबांदोडा तालुक्यातील शेतकऱयांचा शेती व्यावसायाकडे कल वाढलेला आहे. भात शेतीबरोबरच नगदी पिक म्हणून भाजी पाल्याची लागवडही मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. तालुक्यात कृषी उत्पादन वाढण्यास विविध कारणे असली तरी त्याचे श्रेय कोरमरपंत यांनाही द्यावे लागेल. किसान सभा वाकीकुळण शिगांव या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नरेश शिगांवकर यांनी कोमरपंत यांच्याबद्दल व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. कोमरपंत यांचे नाव तालुक्यातील गावोगावी पोचले असून शेतीसाठी प्रोत्साहन देण्याची त्यांची विशिष्ठ पद्धत शेतकऱयांना विशेष भावते. तालुका पातळीवर शेतकऱयांच्या बैठका घेऊन लागवडीसंबंधी ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. शेतकऱयांना प्रोत्साहन देताना ‘तुम्ही तुमच्या योजना सांगा, पुढे काय करायचे ती जबाबदारी आमची आहे’ अशा शब्दात शेतकऱयांची मने ते सहजपणे वळवतात. किसान सभा वाकीकुळण या शेतकरी संघटनेला त्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. मागील रब्बी हंगामात हळसांडे व इतर भाजी लागवड करण्यास त्यांनी शेतकऱयांना प्रोत्साहन दिल्याने बारा शेतकऱयांनी भाजीपाल्याचे पिक घेतले. शेतकऱयांना समस्या प्रत्यक्ष शेतात जाऊन सोडविण्याचे काम ते करतात. मित्रत्वाच्या नात्याने शेतकऱयांशी ते सहज मिसळून जातात.
वागोण दाभाळ येथील शेतकरी तथा पंचसदस्य तुळशीदास गावकर सांगतात कोमरपंत हे शेतकऱयांच्या कोणत्याही अडचणीवर योग्यप्रकारे मार्गदर्शन करून तोडगा काढतात. प्रत्यक्ष शेतात येऊन समस्या जाणून घेण्याची त्यांची खासियत आहे. वागोण येथे सुमारे 50 शेतकरी भातशेतीचे पिक घेतात. त्यासाठी वेदांता खाण कंपनीचे आर्थिक साहाय्य लाभत आहे. सुमारे 15 हेक्टरमध्ये खरीफ हंगामात भाताचे पिक घेतले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्थानिक आमदारांचे शेतकऱयांना प्रोत्साहन
शेतकऱयांनी कृषी व्यवसायाकडे वळावे यासाठी स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर हेही प्रयत्नशील आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते शेतकऱयांना बियाणे, खत व लागवडीसाठी लागणारी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देत आहेत. प्रत्येक शेतकऱयाने सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, अडीअडचणी असल्यास त्या आपल्या समोर मांडाव्यात, असे आवाहन ते सातत्याने करतात.









