प्रतिनिधी / कारवार
हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वर मोटारसायकलस्वारांना गन आणि अन्य शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून लुटलेल्या त्रिकुटाला 12 तासाच्या आत मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यल्लापूर पोलिसांना यश आले. ही घटना यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्त्यावरील मल्लिका हॉटेलजवळ घडली. सोमवारी रात्री ही घटना घडली होती.
ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे मौलाली मोहम्मदसाब हुलगोरू (वय 34, रा. देवीकोप्प, कलघटगी), मोहम्मद असीफ मोहम्मद इलियास (वय 37, रा. सोरब) आणि हताउल्ला इस्माईल साब (वय 36, रा. सागर) अशी आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींकडून लुटण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, रोख रक्कम, मोटारसायकल आणि मारुती 800 कार जप्त केली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, हावेरी येथील कृष्णाजी नारायण हावेरी, हेमंत नारायण हावेरी आणि आकाश गणपती हे गावळी मोटारसायकलवरून सोमवारी रात्री निघाले असता यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल मल्लिकाजवळ तीन अज्ञातांनी अडविले.
एकटय़ाने गनचा आणि दुसऱयाने लोखंडी रॉडचा धाक दाखविला आणि जीवे मारण्याची धमकी देऊन मोटारसायकल स्वारांकडील 820 रुपये रोख रक्कम, चांदीची साखळी आणि मोटारसायकल असा एकूण 42 हजार रुपयांचा ऐवज घेऊन तेथून पोबारा केला. कृष्णाजी नारायण हावेरी यांनी यल्लापूर पोलीस ठाणे गाठले आणि त्या अज्ञात त्रिकुटाच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्या त्रिकुटाला ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील लुटलेले साहित्य, मंकी कॅप्स आणि मारुती 800 कार, पिस्तूल (एअर गन) असा एकूण 90 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.









