ऑनलाईन टीम / झाडेगाव :
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या छोट्याशा गावात 155 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवासांपूर्वी गावात सात दिवासांच्या धार्मिक कार्यक्रमाचे गावकऱ्यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या कार्यक्रमाला गावकऱ्यांसहित बाहेरगावातून काही मंडळी सहभागी झाली होती. मात्र कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्यामुळे गावात संसर्ग पसरला आणि तब्बल 155 जणांना कोरोना झाला. आता गावाला प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आले असून, गावात आरोग्य पथक, महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरु झाली आहे. गावातील प्रत्येकाची टेस्ट करण्यात येत आहे.
दरम्यान, गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळे आता अजून किती जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात हे काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र नागरिकांनी कोरोना गेला असे समजून काळजी न घेतल्याने अख्ख गावच संकटात सापडले आहे.
त्यातच कालच्या दिवशी जिल्ह्यात 416 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता अधिक कड़क निर्बंध लावण्यात येत आहेत.








