ऑनलाइन टीम / मुंबई :
नोव्हेंबरमध्ये सत्ता स्थापनेसाठी शह-काटशहाचा खेळ सुरू असताना राज्यात मात्र 300 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात ऑक्टोबरमध्ये आत्महत्येच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचंही दिसून आलं आहे. राज्याच्या महसूल विभागाच्या आकडेवारीतून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱयांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यापूर्वी 2015 मध्ये महिन्याभरात 300 हून अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं. राज्यात २०१९मध्ये एकूण २५३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०१८मध्ये हा आकडा २५१८ इतका होता.
अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी शेतकऱयांना फटका बसला आहे. तर जवळपास 70 टक्के पिकांचं नुकसान झालं. ऑक्टोबर महिन्यात 186 तर नोव्हेंबर महिन्यात 114 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. सर्वात जास्त आत्महत्या दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात झाल्या आहेत. मराठवाडय़ात नोव्हेंबर महिन्यात 120 शेतकऱयांनी तर विदर्भात 112 शेतकऱयांनी आपलं जीवन संपवलं.