ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिक मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका 23 वर्षीय मुलाने आपल्या आईला कोरोनाची लागण झाली हे समजताच आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना नाशिकरोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी येथे घडली. आईला बघून आल्यावर संबंधित मुलाने शुक्रवारी मध्यरात्री नैराश्येपोटी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
या मुलाच्या आईवर गेल्या काही दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयातील सेंटरमध्ये उपचार सुरु होते. 23 वर्षीय मुलाला आपल्या आईला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं. यानंतर त्याने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकारानंतर या परिसरातील नागरिकांनी पोलिसांना तात्काळ बोलावले. त्यानंतर उपनगर पोलीस सध्या सर्व गोष्टींचा तपास करत आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात काल दिवसभरात तब्बल 615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 241 वर पोहचली. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 8 हजार 682 वर गेला.
शुक्रवारी दिवसभरात उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या 329 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 5 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत 2 हजार 588 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मृतांची एकूण संख्या 371 वर पोहोचली आहे.









