मिरजेत शनिवार पेठे येथील अपार्टमेंटमधील घटना, अन्नत्याग केल्याने झाला होता मृत्यू
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील शनिवार पेठेतील आशा टॉकिज जवळील एका अपार्टमेंटमध्ये एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. सदर तरुणाने अन्नत्याग केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सदर फ्लॅटमध्ये बहिण – भाऊ राहण्यास होते. तीन दिवस भावाचा मृत्यू होऊनही बहिण त्याच ठिकाणी राहत होती. हे दोघेही मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
सदरच्या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? याची माहिती मिळू शकली नसली तरी रहिवाशांच्या मते त्याने गेली अनेक दिवस अन्नत्याग केला होता. सदर तरुण हा उच्चशिक्षित होता. त्याने अभियांत्रिकी पदवी मिळविली होती. तो परदेशात काही वर्षे नोकरीही करीत होता. मात्र, तेथे संबंधीत अध्यात्मिक संस्थेशी संपर्क आल्यानंतर त्याने नोकरी सोडून दिली. त्याची बहिणही एमएस्सी असून, तीही या संस्थेच्या संपर्कात होती. हे दोघे भावंडे या संस्थेच्या इतक्या आहारी गेले होते की दोघेही मनोरुग्ण झाले होते. अलीकडे सदर तरुणाची मानसिक स्थिती बिघडली होती. मनोरुग्ण बहिण ही घरोघर जावून अन्न मागून खात असे.
तर भावाने गेली महिनाभर अन्न सोडले होते. गेल्या महिनाभरापासून रात्रीच्यावेळी तो जोरजोरात किंचाळत होता. दोघे बहिण-भाऊ फ्लॅटचा दरवाजा बंद करुन नेहमी एकांतात रहात होते. दोन दिवसांपूर्वी सदर फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी फ्लॅटचा दरवाजा उघडून पाहिले असता सदरचा तरुण हा मृतावस्थेत आढळून आला. तो दोन-तीन दिवस अगोदर मरण पावला असावा. त्यामुळे मृतदेह कुजला होता. मात्र, त्याची मनोरुग्ण बहिण ही तेथेच रहात होती.
उच्चशिक्षित कुटुंबाची वाताहत
संबंधीत तरुणाचे सर्व कुटुंबिय हे उच्चशिक्षित होते. वडील हे एका शिक्षण संस्थेत शिक्षक होते. आईही खासगी क्लास घेत असे. बहिण एमएस्सी झाली होती. तर संबंधीत तरुण हा अभियांत्रिकीमध्ये एमटेक झाला होता. त्याला परदेशात लाखो रुपयांची नोकरीही होती. मात्र, एका टफ्फ्यावर या कुटुंबाचा एका आध्यात्मिक संस्थेशी संबंध आला. त्यानंतर या संपूर्ण कुटुंबाने या संस्थेलाच वाहून घेतले. संस्थेच्या कार्यात इतके दंग झाले की त्यातच संपूर्ण कुटुंब मनोरुग्ण बनले. कुटुंबातील सदस्य गावोगाव जावून पुस्तके वाटू लागली. लोकांकडे मागून खाऊ लागले. एका उच्चशिक्षित कुटुंबाची झालेली ही वाताहत पाहून नागरीकांनी हळहळ व्यक्त केली.
Previous Articleमुंबईत आज घुमणार मराठ्यांचा आवाज
Next Article सांगली : पुष्पराज चौकाचा 31 वर्षानंतर होणार कायापालट








