प्रतिनिधी / पलुस
गेल्या तीन वर्षापासून द्राक्षाचा हंगाम वाया गेला आहे. तसेच यंदाही राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक असून कृषी विभागाने यासंबंधीचा अहवाल तातडीने राज्य शासनाकडे पाठवावे, असे निर्देश कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज येथे दिले.
द्राक्ष बागायतदार संघटनेच्या प्रतिनिधींची आज डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले. कृषी संचालक दिलीप झेंडे, संचालक ( विस्तार ) श्री. मोटे, सांगली जिल्ह्याचे कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, संघटनेचे प्रतिनिधी मारुती चव्हाण, संदीप शिरसाळ, सचिन जाधव, संजय माळी, केशव चव्हाण, प्रकाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून द्राक्षाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तसेच यंदाही अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.








