मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे साधला संवाद
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्युदर वाढतच आहे. मृत्युदर नियंत्रणात आण़ण्यासाठी शासकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथे अत्याधुनिक व्हेंटिलेटर प्रणाली तसेच हाईफ्लो ऑक्सिजन कॅनोला व बायपेयुक्त 200 बेडचे ॲडव्हान्स कोरोना केअर युनिट युध्दपातळीवर उभा करावे अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील शिवसेना खासदारांशी व्हिडिओ कॅान्सफरंन्सव्दारे चर्चा केली. यावेळी खासदार मंडलिक यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
खासदार मंडलिक म्हणाले, जिल्ह्याला दररोज 50 मॅट्रिक टन ऑक्सीजनची आवश्यकता असताना दररोज 35 मे.टन इतकाच ऑक्सीजन उपलब्ध होत आहे. कर्नाटक राज्यातील बेलारी येथून होणारा ऑक्सीजन पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे थांबला आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. सी.पी.आर. हॅास्पीटल येथे 400 ते 500 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे सी.पी. आर.ला दररोज स्वतंत्र 10 मे.टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे खासदार मंडलिक यांनी नमूद केले.
त्याच बरोबर जिल्ह्याला दररोज 4000 रेमडीसिविअर इंजेक्शनची गरज आहे. मात्र दिवसाकाठी दोनशे पन्नास इतकीच इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने, गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे. याकरीता रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा जास्तीत जास्त व्हावा. हीच परिस्थिती लसीकरणाबाबतही असून दैनंदिन 50 हजार इतक्या डोसची आवश्यकता असताना दोन दिवसातून 20 हजार डोस उपलब्ध होत असल्याकारणाने शासकीय दवाखान्यांवर याचा ताण पडत असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी मागण्यांसंदर्भातील परीपुर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करू असे आश्वासन दिले.