खानापूर-दुर्गानगरनजीक दुर्घटना : एकाचा मृतदेह सापडला, दुसऱयाचा शोध सुरूच, आठवडय़ातील दुसरी घटना

वार्ताहर /खानापूर
खानापूर-दुर्गानगर येथील दोन शाळकरी मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाली होती. सदर मुलांचा दुर्गानगरजवळील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पाठीमागील मलप्रभा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहित अरुण पाटील (वय 15) व श्रेयस महेश बापशेठ (वय 13) अशी त्या मुलांची नावे आहेत. श्रेयश बापशेठ याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी हाती लागला आहे. तर रोहित याच्या मृतदेहाचा तपास अद्याप सुरू आहे.
रोहित व श्रेयस हे दोघे आपल्या मित्रांसमवेत नदीकाठावर नेहमीप्रमाणे खेळायला गेले होते. त्याठिकाणी त्या दोघांसह पाच मुले अशी एकूण सात मुले होती. आंघोळीसाठी ती नदीत उतरली असता रोहित व श्रेयस बुडाल्याची माहिती मुलांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे सोमवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास सुरू होता.
दरम्यान, सोबत असलेल्या अन्य मुलांनी घाबरून त्या दोघा बुडालेल्या मुलांचे कपडे नदीकाठावरील मातीच्या ढिगाऱयाखाली लपवून ठेवले होते. अखेर मंगळवारी सकाळी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास हाती घेतला व त्या मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता रोहित व श्रेयस हे दोघे नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले असता ते बुडाले. पण आम्ही भीतीने कोणाला काही सांगितले नसल्याची कबुली रोहितचा भाऊ व अन्य दोन मुलांनी दिली.
त्यानंतर बुडालेल्या दोन मुलांचा शोध सुरू करण्यात आला. मंगळवारी उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. सायंकाळी श्रेयसचा मृतदेह आढळून आला.
रोहितचे वडील माजी सैनिक असून अनगडी येथील दुर्गानगर येथे गेल्या आठ वर्षांपासून स्थायिक आहेत. त्यांना एकूण तीन मुले असून रोहित हा दुसऱया क्रमांकाचा मुलगा होता. मन्सापूर सेंट झेवियरमध्ये आठवीमध्ये तो शिकत होता. तर श्रेयस याचे वडील महेश बापशेठ हेही माजी सैनिक असून ते तालुक्मयातील संगरगाळी येथील रहिवासी असून तेही दुर्गानगर येथे वास्तव्यात आहेत. श्रेयस हा त्यांचा एकुलता मुलगा होता. तो सर्वोदया शाळेमध्ये सातवीत शिकत होता.
आठवडय़ाभरात दुसरी दुर्दैवी घटना
खानापूर तालुक्मयातील गणेबैल येथे पाणी भरलेल्या खड्डय़ात पडून दोन मुलांचा मृत्यू झालेली घटना ताजी असतानाच पुन्हा दोन शाळकरी मुलांचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. भूतनाथ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निलजकर कुटुंबातील दोन मुलांचा पाणी भरलेल्या खड्डय़ात पडून मृत्यू झाला होता. केवळ आठवडय़ाभराच्या अंतरानंतर दुर्गानगरमधील दोन शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सध्या आठवडय़ाभरापूर्वी झालेल्या मोठय़ा पावसामुळे नदीच्या पात्रात भरपूर पाणी आले आहे. त्यामुळे मृतदेह शोधण्यात अडथळा निर्माण झाला असून रोहितच्या मृतदेहाचा तपास सुरू आहे.









