जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी टंचाई; महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात बहुतांशी औषध वितरकाकडे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही. जिल्ह्यात दोन मंत्री असतानाही केवळ एक टक्का इंजेक्शन उपलब्ध होतात. केवळ कागदोपत्री नियोजन दाखवून प्रशासन वेळ काढत असल्याचा आरोप करून तात्काळ इंजेक्शन उपलब्ध न झाल्यास येत्या दोन दिवसात हाहाकार उडेल रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी अक्षरशः भीक मागावी लागेल अशी भीती महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
यासंदर्भात अन्न व औषध विक्रेता कार्यालय तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही विजय पाटील यांनी सांगितले. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विविध हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित पाचशे रुग्ण ॲडमिट आहेत अशा स्थितीत एकाही वितरकाकडे इंजेक्शनचा पुरेसा साठा नाही. दररोज १००० इंजेक्शनची आवश्यकता असताना केवळ शंभर ते दीडशे इंजेक्शनवर बोळवण केली जाते. दोन मंत्री असताना जिल्ह्यातील नागरिकांची ही अवस्था दयनीय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
सध्या जिल्ह्यात होलसेल विक्रेत्याकडे केवळ दोन दिवस पुरेल इतकेच इंजेक्शन आहेत. त्याचबरोबर विविध कंपन्यांनुसार इंजेक्शनच्या किमती वेगवेगळ्या आहेत ही किंमतीतील तफावत शासन दूर करू शकले नाही. त्याचबरोबर या इंजेक्शन वरील जीएसटी रद्द केल्या नाही त्यामुळे इंजेक्शनसाठी गरिबांची परवड सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल दुर्गाडे, अविनाश कोरे, विनायक शेटे, विजयकुमार पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.