श्रीनगर / वृत्तसंस्था
भाजप नेते वासीम बारी आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य दोघांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना रविवारी कंठस्नान घालण्यात आले. मृत दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील बंदिपुरा येथे काही दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने विशेष शोधमोहीम हाती घेतली. यानंतर शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्यानंतर चकमक झाली. वाट्रिना भागात झालेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या चकमकीनंतर आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, दिवसभरात अन्य कोणीही संशयित सापडला नाही.









