जिल्हय़ात रत्नागिरी, राजापूरमध्ये जोरदार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दमदार एन्ट्री केलेल्या मान्सूनने रत्नागिरीला शुक्रवारी सायंकाळी चांगलेच झोडपून काढले. हा पाऊस रत्नागिरी व राजापूर तालुक्यात आभाळ फाटल्यागत धुवाँधार कोसळला. त्यामुळे रत्नागिरी शहर परिसरात पडलेल्या पावसाची या हंगामात सुरूवातीलाच 237 मिलिमीटर इतकी विक्रमी नोंद झाली. अवघ्या दोन तासाच्या कालावधीत धो-धो कोसळलेल्या या पावसाने शहरातील अनेक भागात पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
रत्नागिरी जिह्यात आगमन झालेला मान्सून आता सर्वदूर पोहचला आहे. जिह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पर्जन्यमान होत आहे. हवामान विभागाने बुधवारी रत्नागिरीत जोरदार पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला होता. मात्र गुरूवारी दिवसभर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी मात्र दणक्यात एन्ट्री केली. या धुवाँधार पावसाने रत्नागिरी शहर व तालुक्याला चांगलेच झोडपून काढले.

रत्नागिरी शहरात या पावसाने साऱयांचीच तारांबळ उडवून दिली. गटारे तुंबल्याने या पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. अनेक ठिकाणी सखल भागातील रस्त्यांवर तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे वाहनधारकांना या पाण्यातून मार्ग काढताना जणू कसरत करावी लागली. जयस्तंभ, मारूतीमंदिर, आरोग्यमंदिर, नाचणे रोड, शिवाजीनगर, जे.के.फाईल्स, टिआरपी याठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचले, तर गटारे तुंबल्याने रस्त्यावरून पाण्याचे ओहोळ तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.
यादिवशी सायंकाळी अवघे दोन तासभर धो-धो बरसात झाली. त्याने रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत तुंबलेल्या गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले होते. रामआळी, गोखलेनाका भागात पाणी तुंबल्याने त्यातून वाहनधारकांची मोठी अडचण सहन करावी लागली. काही गाडया त्या पाण्यामुळे बंदही पडल्या होत्या. तिच परिस्थिती इतर उताराच्या रस्त्यावर दिसून येत होती. या पावसाचा जोर सुमारे 8 वाजल्यानंतर काहीसा ओसरला. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला.
शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार शनिवारी पहाटेपर्यंत सुरूच होती. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या 24 तासांत जिह्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात 237 मिलिमीटर नोंदले गेले. त्याखालोखाल राजापूर तालुक्यात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र या पावसाने शनिवारी सकाळपासूनच विश्रांती घेतल्याने वातावरणात कडक ऊन तर ढगाळ वातावरण राहिले होते.









