@ श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी अवंतीपोरा जिल्हय़ातील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापूर्वी पहाटेच्या सुमारास शोपियानच्या चौगाम भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याने दिवसभरात चौघांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. शुक्रवारीही सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. त्यामुळे 36 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये पाच दहशतवादी मारले गेल्याचे एका वरि÷ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. दोघेही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यातील एक बारीपोरा येथील सज्जाद अहमद आणि दुसरा पुलवामा येथील राजा बासित नजीर असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. शोपियानच्या चौगाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसराला वेढा घातला. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. त्याचबरोबर परिसरात शोधमोहीम सुरू आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाकडून एकत्रितपणे परिसरात शोध घेतला जात होता.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर जवानांनी शनिवारी पहाटेच संबंधित ठिकाणी शोधमोहीम सुरू केली होती. त्यानंतर जवानांची चाहूल लागताच या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांकडून झालेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली.