क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील सेसा फुटबॉल अकादमी आणि कुडचडेच्या गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लब यांच्यातील लढत 2-2 अशी बरोबरीत संपली. काल हा सामना जीएफएच्या धुळेर फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आला.
सामन्याच्या पहिल्या सत्रात गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लबने दोन गोलांची भक्कम आघाडी घेतली होती. त्यांच्या जॉएल बार्रेटो आणि बॅनेस्टन बार्रेटोने तर सेसा फुटबॉल अकादमीचे दोन्ही गोल कॅजिटन फर्नांडिसने दुसऱया सत्रात नोंदविले. या निकालाने उभय संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. पहिल्या सत्रात गार्डीयन एँजल क्लबने तर दुसऱया सत्रात सेसा फुटबॉल अकादमीचे वर्चस्व आढळून आले. सामन्याच्या आरंभालाच लॅनी फर्नांडिसच्या कॉर्नरवर जॉएल बार्रेटोचा गोलमध्ये जाणारा फटका सेसाच्या सूरजने गोलरेषेवरून बाहेर काढल्याने गार्डीयन एँजल क्लबची गोल करण्याची संधी हुकली. त्यानंतर जॉएल बार्रेटोने गोल करून गार्डीयन एँजलला आघाडीवर नेले. त्यानंतर पहिल्या सत्रातील इंज्युरी वेळेत गार्डीयन एँजलने दुसरा गोल कररून आपली आघाडी दोन गोलांनी वाढविली. बसंता सिंगचा फटका फटका सेसा फुटबॉल अकादमीचा गोलरक्षक सपमने अडविला, मात्र तो चेंडू आपल्या ताब्यात ठेऊ शकला नाही. मिळालेल्या चेंडूवर बॅनेस्टन बार्रेटोने गोल करून संघाला दोन गोलांची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात सेसा फुटबॉल अकादमीचा संघ निश्चितच उजवा ठरला. 52व्या मिनिटाला सेसाला पेनल्टी फटका बहाल झाला. यावेळी सेसाच्या स्टेफनचा क्रॉस बेंजू क्लेमंतने हाथाळला. यावेळी मिळालेल्या पेनल्टीवर कॅजिटन फर्नांडिसने गोल करून सेसा फुटबॉल अकादमीची पिछाडी एक गोलने कमी केली. त्यानंतर लगेच कॅजिटन फर्नांडिसने फ्रिकीकवर गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. बरोबरीनंतर गार्डीयन एँजल स्पोर्ट्स क्लबच्या जॉएल बार्रेटोचा गोल करण्याचा यत्न सेसाचा गोलरक्षक सपमने उधळून लावला. या सामन्यात दोन्ही गोलरक्षकांनी उत्कृष्ट गोलरक्षण केले.








