प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र अग्नीसुरक्षा अभियानांतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेस दोन अग्नीशमन केंद्रे व गार वाहने खरेदीसाठी तब्बल ४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. माळ बंगला येथील जलशुध्दीकरण केंद्र व हनुमाननगर येथील ऑक्सीडेशन पॉईंट येथे अद्यायावत अग्नीशमन केंद्रे बांधण्यात येणार असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.
ते म्हणाले, नगरविकास विभागाच्या वतीने दि ३१ ऑगस्ट २००९ रोजी राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदानमधील अग्निशमन सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र आसुिरक्षा अभियान राबविण्याबाबत शासन निर्णय करण्यात आला होता. त्यानुसार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने दोन अग्नीशमन केंद्र व चार अत्याधुनिक वाहने खरेदीसाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र अग्नीशमन सेवा संचालनालयाकडे सादर करण्यात आला होता. तत्पूर्वी १९ मार्च २०२१ रोजी झालेल्या महासमेत तसा ठराव करण्यात आला होता.
हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगत आयुक्त कापडणीस म्हणाले, शासनाने ४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीस मंजूरी दिली आहे.
या निधीमधून दोन अग्नीशमन केंद्रे व चार वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. एकूण ४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीपैकी राज्य शासनाच्या ७० टक्के हिस्यातील एकूण ३ कोटी ४६ लाख ५० हजार निधीपैकी २ कोटी ५० लाख इतका निधि वितरित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. माळबंगला येथील जलशुध्दीकरण केंद्र व व हनुमान नगर येथे ऑक्सीडेशन पॉइंट येथे अग्नीशमन केंद्र बांधण्यात येणार आहेत.