अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे तालुक्यातील अनेक जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित
दोडामार्ग मधील भूमी अभिलेख कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे शहरातील तसेच तालुक्यातील अनेक जमीन मोजणीची प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित राहिली आहेत. ते पाहता या कार्यालयात आकृती बांधनुसार आवश्यक कर्मचारी वर्ग नेमण्याकडे भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. विजय वीर यांची ओरोस येथे भेट घेणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी आज दिली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचेही लक्ष वेधणार असेही श्री. नानचे म्हणाले.श्री. नानचे यांनी पुढे सांगितले की, दोडामार्ग मधील भूमी अभिलेख कार्यालयात सध्या केवळ 5 कर्मचारी असून नगरपंचायत हद्दीतील तसेच संपूर्ण तालुक्यातील मिळून जवळजवळ 150 च्या आसपास जमीन मोजणीची प्रकरणे या कार्यालयात गेल्या कित्येक महिन्यापासून पडून राहिली आहेत. वर्षभरातील पावसाळी हंगामात जमीन मोजणी प्रक्रिया होत नाही त्यामुळे तीन ते चार महिने वाया जातात. तर उर्वरित दिवसांमध्ये कर्मचारी नसल्यामुळे मोजणीचे अर्ज प्रलंबित राहतात. त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ते पाहता दोडामार्ग मधील या कार्यालयात आकृती बंधानुसार आवश्यक कर्मचारी वर्ग नियुक्त होणे गरजेचे आहे असे नानचे म्हणाले.
दोडामार्ग मधील भूमी अभिलेख कार्यालयाचा तात्पुरता पदभार हा सावंतवाडीतील उपअधीक्षक यांच्याकडे आहे. त्यांच्या सूचनेनुसार दोडामार्गातील एकूण पाच पैकी तीन कर्मचाऱ्यांना तेथील कामकाजासाठी जमीन मोजणीसाठी बऱ्याचदा सावंतवाडी येथे जावे लागते. मात्र याचा विपरीत परिणाम दोडामार्गात होतो आहे. वास्तविक पाहता सावंतवाडीतील कामांसाठी येथून कर्मचारी मागवून नेणे व आमच्याकडील कामे रोखून ठेवणे हा एक प्रकारे दोडामार्ग वर अन्याय होत असून भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. विजय वीर यांची येत्या सोमवारी आपण भेट मागितलीअसून त्यांच्याशी या संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली जाईल असेही श्री. संतोष नानचे यांनी स्पष्ट केले
दोडामार्ग – वार्ताहर.









