बैलहोंगल पोलिसांची कारवाई : सरकारी अधिकाऱयांना धमकावून 5 लाखांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
एसीबी अधिकारी असल्याचे सांगत सरकारी अधिकाऱयांकडे पैशाची मागणी करणाऱया दोघा तोतया अधिकाऱयांना बैलहोंगल पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. कृषी खात्यातील अधिकाऱयाला धमकावून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सोमवारी सायंकाळी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. विशाल भाक्याप्पा पाटील (वय 42, मुळचा रा. देशनूर, सध्या रा. वन्नूर, ता. बैलहोंगल), श्रीनिवास अश्वथनारायण (वय 38, रा. कोडगेनहळ्ळी, सहकारनगर, बेंगळूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत.
त्यांच्या जवळून मोबाईल संच, एक कार जप्त करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी करुन या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर रोजी बैलहोंगल येथील सहाय्यक कृषी अधिकारी बी. आर. हुलगण्णावर यांनी बैलहोंगल पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
कुणी तरी एक व्यक्ती आपण एसीबी अधिकारी असल्याचे सांगत तुमच्या विरुध्द केस आली आहे. तुम्ही बेनामी मालमत्ता जमविला आहात. लवकरच सेवा निवृत्त होणार आहात. तुमच्या घरावर छापा टाकून एफआयआर दाखल केली तर तुम्हाला पेन्शनसुध्दा मिळणार नाही. पाच लाख रुपये देवून प्रकरण मिटवून घ्या, असे सांगण्यात आले होते.
फोनवर अधिकाऱयाला हा निरोप देण्यात आला होता. या संबंधी बैलहोंगल पोलीस स्थानकात भा.द.वि. 419, 420, 506, 511 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता. एसीबीचे पोलीस निरीक्षक एच. सुनीलकुमार, ए. एस. गुदीगोप्प, बैलहोंगलचे मंडल पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, पोलीस उपनिरीक्षक इराप्पा रित्ती व त्यांच्या सहकाऱयांनी या जोडगोळीला अटक केली आहे.









