ज्येष्ठ इतिहास संशोधक ‘रोडमराठाकार’ डॉ. वसंतराव मोरे यांचे मत; पराभवातही युद्धाचा हेतू सफल
कोल्हापूर / प्रतिनिधी
आपल्याकडे एखाद्याचा पराभव झाला तर त्याचे ‘पानिपत’ झाले अशी म्हण रूढ झाली आहे. पण ती चुकीची आहे. कारण पानिपतच्या तिसऱया युद्धात मराठे जरी पराभूत झाले असले तरी या ज्या पद्धतीने मराठे लढले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. युद्धनीतीतील त्रुटीमुळे पराभव झाला असला तरी मराठ्य़ांच्या शौर्याला, आत्माहुतीला शत्रू असणाऱ्या अहमदशहा अब्दालीने देखील सलाम केला होता. परकीय आक्रमणापासून हिंदूस्थानला वाचविण्यासाठी मराठे मोगल बादशहाच्या मदतीला धावून गेले होते. त्यामध्ये स्वार्थ नव्हता तर देशाला वाचविण्याची उर्मी होती. त्यामुळे पानिपतच्या युद्धाकडे मराठ्य़ांच्या शौर्याचे, बलिदानाचे प्रतीक म्हणून पाहावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक ‘रोडमराठाकार’ डॉ. वसंतराव मोरे यांनी केले.
14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि आफगाणिस्तातून आलेला आक्रमक अहमदशहा अब्दाली यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध झाले. या युद्धाला आज 261 वर्षे पूर्ण होत आहेत. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने 14 जानेवारी हा दिवस मराठा शौर्य दिन म्हणून पाळला जातो. आज शुक्रवारी हरियाणातील बस्ताडा येथील शौर्यभूमीत शौर्यदिनाचा कार्यक्रम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. वसंतराव मोरे यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत या युद्धाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
प्रश्न : पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठय़ांचा पराभव झाला. त्याकडे तुम्ही कसे पाहता ?
डॉ. मोरे : पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या आधी मराठे आणि अब्दाली यांच्यात दोन युद्धे झाली होती. ती मराठ्य़ांनी जिंकली होती. त्यामुळे पानिपतच्या तिसऱ्या युद्धावेळी अब्दाली तयारीने आला होता. मराठेही कमी नव्हते पण युद्धनीतीतील त्रुटींमुळे मराठे हरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीकडे दुर्लक्ष केल्याचा फटकाही मराठ्य़ांना बसला. तरीही शौर्य, पराक्रमाचे महत्व कमी होत नाही. विजयी अब्दालीने मराठ्य़ांचे शौर्याचे, लढावू बाण्याचे कौतुक केले आहे. तसे ऐतिहासिक पत्र आहे. या युद्धात अब्दालीचे प्रचंड नुकसान झाले. तो पुन्हा आक्रमण करण्यासाठी आला नाही, हे भारतीयांनी लक्षात ठेवले पाहिजे.
प्रश्न : या युद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला ?
डॉ. मोरे : या युद्धानंतर भारतावर खैबर खिंडीतून होणारी परकीयांची आक्रमणे पूर्णपणे थांबली. भारतात मराठे जागे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका, असा संदेश अफगाणिस्तान, बलुचिस्तानमधील आक्रमकांत त्यावेळी गेला होता. मराठय़ांच्या पराभवातही युद्धाचा हेतू सफल झाला. मात्र आजवर पानिपत झाले म्हणजे पराभवच सांगितला गेला. पण त्याचे विश्लेषण केल्यानंतर मराठा स्वार्थासाठी नव्हे तर परकीय आक्रमणापासून तेंव्हाच्या मोगल बादशहाला आणि देशाला वाचविण्यासाठी पानिपतात लढला हे स्पष्ट होते. या युद्धाने मराठा सत्ता कमजोर झाली. दिल्लीचा मोगल बादशहा देखील इंग्रजांकडून पराभूत झाला. हळूहळू इंग्रजांची सत्ता देशभर पसरत गेली.
प्रश्न : पानिपतच्या युद्धातून बचावलेल्या मराठय़ांना रोड मराठा म्हटले जाते, त्या विषयी काय सांगाल ?
डॉ. मोरे : पानिपतच्या तिसऱया युद्धात सव्वा लाख मराठे धारातीर्थी पडले. पराभव झाल्यानंतर वाचलेले मराठा सैनिक, सेनानी, ज्यांचा उल्लेख हरवलेला समाज असा केला जातो. या समाजाने पानिपत जवळ असलेल्या धनदाट जंगलाचा आसरा घेतला. छपत छपत अनेक वर्षे काढली. नंतर वसाहती केल्या. आपली ओळख लपविण्यासाठी नावे बदलली. रोड नावाच्या रजपूत राजाचे वंशज असल्याचे जाहीर केले. पिढय़ा बदलत गेल्यानंतर त्यांना आपण मराठा असल्याचा विसर पडला. ते स्वतःला रोड समजू लागले. दहा पंधरा वर्षांपूर्वी रोड समाजातील सनदी अधिकारी वीरेंद्रसिंह वर्मा यांच्याशी संपर्क आल्यानंतर संशोधन सुरू केले. त्यातून ‘रोड मराठों का इतिहास’ हे पुस्तक लिहिले. त्यासाठी हरियाणात फिरून चाली, रिती, परंपरा, संस्कार, नावे, आडनावे यांचा अभ्यास केला. त्यातून सध्याचे रोड हे पानिपतच्या युद्धातून बचावलेले मराठे असल्याचे केवळ ऐतिहासिक नव्हे तर सामाजिकशास्त्राrय दृष्टीने शोध घेऊन सिद्ध केले.
प्रश्न : रोड मराठांच्या अभ्यास करतानाचे काही संदर्भ सांगाल ?
डॉ. मोरे : आपल्याकडे शिंक आली की आपण ‘राम कृष्ण हरी’ असे उद्गार काढतो. रोड समाजात शिंक आली की, शिंकणारा ‘छत्रपती की जय’ असे उद्गार काढतो. हे उद्गार 250 वर्षे रोड समाज काढत होता. वीरेंद्रसिंह यांना प्रश्न पडला, आपण असे उद्गार का काढतो?, देशात फक्त मराठा राजालाच छत्रपती म्हणतात, मग आपले मुळ मराठा तर नाही ना?, रोड स्वतःला रजपूत समजतात मात्र रजपूतात कोणीही छत्रपती नाही मग छत्रपती की जय उद्गार आले कुठून याचा शोध ते घेत असताना त्यांचा माझ्याशी संपर्क आला. त्यातून मी संशोधन सुरू केले. त्यातून रोड हे मराठाच आहेत, हे सिद्ध झाले आहे. स्वतः वीरेंद्रसिंह वर्मा हे स्वतःचे नाव मराठा वीरेंद्रेसिह वर्मा असे लावत आहेत. इतर रोड मराठाही जागृत झाले आहेत.
प्रश्न : रोड मराठा हरियाणात कोणत्या भागात आणि कशा स्थितीत आहे ?
डॉ. मोरे : हरियाणात रोड मराठा समाजाची संख्या दहा लाखाच्या आसपास आहे. कुरूक्षेत्र, पानिपत, सोनिपत, कैथल, पुंजपुरा, कर्नाल, यमुनानगर या जिल्हय़ात बहुसंख्येने रोड मराठा आहेत. यमुना नदीच्या काठावरील या जिल्हय़ात सुपिक जमिनीवर रोड मराठा शेतकरी बासमती तांदुळ आणि गहू पिकवतो. रोड मराठा समाजाचे दोन आमदार आहेत. तसेच ऑलिम्पिवीर सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (चोपडे), ऑलिम्पिवीर मुष्टियोद्धा मनोजकुमार हे देखील रोड मराठे आहेत.
प्रश्न : 14 जानेवारी शौर्यदिनाविषयी काय सांगाल ?
डॉ. मोरे : पानिपतच्या पहिल्या दोन युद्धांची स्मारके हरियणात आहेत. पण तिसऱया युद्धाचे स्मारक नाही. 14 जानेवारी 1761 हा दिवस मराठय़ांच्या शौर्याचे, आत्माहुतीचे प्रतीक आहे. हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करण्याची माझी कल्पना मराठा वीरेंद्रसिंह वर्मांनी यांनी उचलून धरली. 14 जानेवारी 2011 रोजी पानिपतावर पहिला शौर्यदिन साजरा झाला. यावेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई, बाजीराव पेशवा, दत्ताजी शिंदे, भाऊसाहेब, विश्वासराव, मल्हारराव, समशेर बहाद्दूर, महादजी शिंदे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. भारतातून मराठय़ांचे जथ्ये या सोहळय़ाला आले होते. देशातील गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, कृष्णा, कावेरी आदी नद्यांचे पाण्याचा अभिषेक करण्यात आला. यावेळी वीर मराठय़ांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने दरवर्षी अंखडीतपणे शौर्यदिन साजरा केला जात आहे.








