बिशप जोसेफ यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळमधील लव्ह जिहा आणि नार्कोटिक्स जिहादचा मुद्दा उपस्थित करून देशभरात चर्चेत आलेले साइरो-मालाबार कॅथोलिक चर्चच्या पाला डायोसिसचे बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी बेगडी धर्मनिरपेक्षता भारताला उद्ध्वस्त करून टाकणार असल्याचे शनिवारी म्हटले आहे. खऱया धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचे रक्षण करण्याची गरज आहे, पण बेगडी धर्मनिरपेक्षता ऱहासाचे मूळ असल्याचे ते म्हणाले.
गांधी जयंतीनिमित्त चर्चशी संबंधित दीपिका या वृत्तपत्रात त्यांनी एक लेख लिहिला आहे. जे लोक चुकांच्या विरोधात बोलत नाहीत, ते नकळतपणे अशा गुन्हेगारांना प्रोत्साहित करत आहेत. समाजातील चुकीच्या गोष्टींच्या विरोधात देण्यात आलेल्या इशाऱयांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी भविष्यातील घटना रोखण्यासाठी त्याबद्दल चर्चा आणि गांभीर्याने विचार केला जावा असे बिशप जोसेफ यांनी लव्ह जिहाद आणि नार्कोटिक्स जिहादच्या मुद्दय़ावर नमूद केले आहे.
आम्ही धर्मनिरपेक्षेतचा मार्ग निवडून सांप्रदायिक स्वरुता ध्रूवीकृत केरळच्या दिशेने जात आहोत का हा प्रश्न चिंतेचा विषय असल्याचे बिशप जोसेफ यांनी केरळ समाजातील धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलताना म्हटले आहे. अखेर या धर्मनिरपेक्षतेचा खरा लाभ कुणाला मिळतोय हा प्रश्न अनेक समुहांमधून उपस्थित होतोय असेही ते म्हणाले.
धर्मनिरपेक्षता हा भारताचा मूळ स्वभाव आहे, पण बेगडी धर्मनिरपेक्षता देशाला नष्ट करणार आहे. आमची घटना धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. धार्मिक समुदाय आणि धर्मनिरपेक्ष समुदायाने एकत्र राहणे शिकावे. सर्व धर्मांचा सन्मान केला जावा हेच भारतीय धर्मनिरपेक्षतेचे सार असल्याचे बिशप म्हणाले.
पश्चिमेकडे रुढिवादी वांशिक आंदोलनांच्या विकासाला पाहून धर्मनिरपेक्षता कट्टरवादाला कशाप्रकारे जन्म देते हे आम्हाला समजून घ्यावे लागेल. भारतीय धर्मनिरक्षतेला त्याच्या शाब्दिक अर्थांमध्ये स्वीकार करण्यास अयशस्वी ठरल्यास भारताची स्थितीही वेगळी नसेल असा इशारा त्यांनी दिला आहे.









