‘कोकण मेरिटाईम क्लस्टर’ नावाने प्रकल्पाची स्थापना
गोव्यासह कोकण, कर्नाटकालाही होणार फायदा
जहाज उद्योगांना जागतिक दर्जाच्या मिळणार सेवासुविधा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विशेष प्रयत्नाने मिळाला प्रकल्प
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नातून ‘कोकण मेरिटाईम क्लस्टर’ या नावाने देशातील पहिला समूह सागरी सेवा प्रकल्प मंजूर झाला असून गोवा-वेर्णे येथे या प्रकल्पाची स्थापना होणार आहे. कोकणसह गोवा, कारवार, बेळगाव येथील सागरी उद्योगाशी संबंधित उद्योग व व्यावसायिकांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर हजारो बेरोजगारांना या क्लस्टरमधून प्रत्यक्ष रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.
देशातील या पहिल्या समूह सागरी सेवा प्रकल्पाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उद्योगमंत्री विश्वजीत राणे यांनी वेर्णे औद्योगिक वसाहतीमध्ये 14380 चौ. मि. चा भूखंड उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कोकण मेरिटाईम क्लस्टरने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उद्योगमंत्री विश्वजित राणे यांचे विशेष आभार मानले आहेत. या प्रकल्पासाठी भारत सरकारच्या जहाज उद्योग मंत्रालयाकडून मान्यता मिळालेली आहे. या शिवाय गडकरी यांच्या लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारचे देखील खूप सहकार्य लाभले आहे. या नियोजित प्रकल्पाच्या गोव्यातील 49 लघु व मध्यम प्रकल्पांबरोबर उर्वरित कोकण, कारवार मधील 180 उद्योगांना लाभ मिळणार आहे.
जागतिक दर्जाची सर्वोत्कृष्ट सेवा देणे हा प्रमुख उद्देश
सागरी उद्योगाशी संबंधित जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट सेवा देणे, हा या कोकण मेरिटाईम समूहाचा उद्देश आहे. शिप डिझायनर्स, जहाजबांधणी, जहाजाची दुरुस्ती, शिवाय अनेक सागरी उपकरणांच्या निर्मितीत या क्लस्टरच्या माध्यमातून तांत्रिक सहकार्य केले जाणार आहे. देशात अशा तऱहेचा हा पहिलाच उपक्रम असून गोवा सरकारने वेर्णे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये या प्रकल्पाला जागा उपलब्ध करून दिल्याने आता लवकरच हा प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
भारतीय किनारपट्टीवरील जहाजबांधणी उद्योगास लाभ
या प्रकल्पाचा लाभ कोकणसह गोवा, कारवार, बेळगाव येथील जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व सागरी उद्योग व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकल्पांसाठी होणार आहेच. त्याचबरोबर या समूहाचा उपयोग संपूर्ण भारतीय किनारपट्टीतील जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती उद्योगांना होणार आहे. तशी सेवा देण्याची तयारी कोकण मेरिटाईम क्लस्टरने केली आहे. सध्या गोव्यात तसेच भारताच्या पश्चिम किनारी भागात अनेक जहाज बांधणी उद्योग प्रकल्प आहेत. प्रत्यक्षात त्यांना युरोपियन राष्ट्रातील कंपन्यांकडून तांत्रिक सहकार्य द्यावे लागत असे. त्यातून मोठय़ा प्रमाणात खर्च होत होता. आता या सर्व सुविधा या प्रकल्पाद्वारे सर्वांना उपलब्ध होणार आहेत.
गोवा मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांचे विशेष आभार
संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी असा प्रकल्प व्हावा, असा प्रस्ताव 2018 मध्ये डॉ. मालिनी शंकर यांनी भारतीय शिपिंग संचालनालयामार्फत आपल्या गोवा भेटीदरम्यान मांडला होता. या प्रस्तावाचे स्वागत करीत प्रथम गोव्यातील उद्योजकांनी एकत्र येऊन हा समूह स्थापन केला व त्यानंतरपासून काम सुरू केले. विद्यमान जहाजोद्योग महासंचालक अमिताभ कुमार यांनी हे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले. तसेच डायरेक्टर शिपिंगमधील कॅ. मोहित बेहल, श्रीबोधराज सूरज दायलानी हे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक असून त्यांच्या नेतृत्वाखाली अमेय सावंत, कॅप्टन नितीन धोंड, दिलीप सावंत, ब्रिजेश मणेरकर, अतूल जाधव व रत्नाकर दांडेकर इत्यादी जहाजबांधणी क्षेत्रातील दिग्गजांनी एकत्रितपणे पुढाकार घेत प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.
रोजगाराची मोठी संधी – कॅ. नितीन धोंड
या समूहाच्या संचालकपदी असलेले आंग्रिया प्रुझचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन नितीन धोंड ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, या प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात कोकणसह गोवा, कारवार, बेळगाव येथील बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. शिवाय राज्याच्या विकासालादेखील मदत होईल. सूरज दायलानी यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकार यांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प अस्तित्वात येत आहे आणि याचा फायदा गोवा, कारवार, बेळगावसह संपूर्ण कोकणला होणार आहे.









