ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा देशातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झाला आहे. इंडीया टुडे या माध्यम समुहाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी व्होटरने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर सर्व्हे केला. या सर्व्हेदरम्यान लोकांना मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यामध्ये 43 टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या 9 मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पहिल्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या क्रमांकावर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकावर आहेत. तर 5 व्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत. 6 व्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, 7 व्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, 8 व्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि 9 व्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत.
या सर्व्हेच्या यादीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील चौथ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरले आहेत. आजारपणामुळे सार्वजनिक कामात सक्रिय नसतानाही उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कायम असल्याचे यामधून दिसून आले.








