एकूण रुग्णसंख्या 71 लाखांच्या पार, 60 हून जास्त वयाच्या रुग्णांमध्ये मृत्युदर 53 टक्के
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन कोविडबाधित आढळण्याचे व बळींची नोंद होण्याचे प्रमाण भारतात घसरत चालले असून मंगळवारी 55,342 नवे बाधित आढळले, तर 706 नव्या बळींची भर पडली. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 86.78 टक्के ठीक झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 11.11 टक्के आहे आणि आतापर्यंत 1.33 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 26 ते 44 वयोगटातील 10 टक्के, तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील 35 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला असून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचा मृत्युदर 53 टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या 71 लाखांच्या पुढे गेली असून यापैकी 8 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. देशात कोविड-19 मुळे आतापर्यंत 1,09,856 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र एक दशलक्ष लोकांमागील कोविडबाधित व बळी यांचा विचार करता जगातील अत्यल्प प्रमाण ज्या देशांमध्ये आहे त्यात भारताचा समावेश होतो. ही स्थिती भारताने कायम राखली असून मागील पाच आठवडय़ांपासून देशात आढळणाऱया नव्या बाधितांची सरासरी घटत चालली आहे.
नव्या बाधितांची सरासरी घटली
सप्टेंबरच्या दुसऱया आठवडय़ात नवे बाधित आढळण्याची सरासरी 92,830 होती. ती ऑक्टोबरच्या दुसऱया आठवडय़ात 70,114 वर पोहोचली. भारतात आढळणाऱया नव्या कोविडबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली असून देशातील 62 लाखांहून अधिक लोक कोरोना संसर्गातून ठीक झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 9 लाखांपेक्षा कमी राहिली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. सरासरी दररोज 11 लाख 36 हजार चाचण्या केल्या जात असून एकूण सक्रिय रुग्णांपैकी 25.38 टक्के महाराष्ट्रात, 13.8 टक्के कर्नाटकात आणि 11.26 टक्के केरळमध्ये आहेत.
फैलाव रोखण्यासाठी जागृती मोहीम
कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी एक जागृती मोहीम सुरू करण्यात येणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या मोहिमेवर जोर देण्यात येणार आहे. तथापि बऱयाच पातळय़ांवर ही मोहीम मार्चपर्यंत सुरूच राहणार आहे. या मोहिमेला ‘जनआंदोलन फॉर कोविड-19’ ’असे नाव देण्यात आले आहे. त्यातून 90 कोटी लोकांमध्ये जागृती करण्याचे उद्दिष्ट आहे, असे माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे.
हिंवाळय़ात फैलाव वाढण्याची भीती
दरम्यान, कोविडबाधितांच्या बाबतीत देशात स्थिरता येत आहे. मृत्युदरही नियंत्रणात आहे. काही राज्यांबाबत चिंता आहेत. पण हिवाळय़ाच्या हंगामात या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी चिंता भेडसावत आहे, असे नीती आयोगाने म्हटले आहे. हिवाळय़ात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीमुळे पुन्हा युरोप आणि अमेरिकेत प्रकरणे वाढू लागली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. 2 देशी लसींची दुसऱया टप्प्यातील चाचणी अंतिम टप्प्यात आहे. सिरमची लस देखील तयार केली जात आहे आणि तिसऱया टप्प्यातील चाचणी चालू आहे. चाचणीचा निकाल नोव्हेंबरच्या शेवटी वा डिसेंबरच्या अखेरीस अपेक्षित आहे, असेही नीती आयोगाने म्हटले आहे.









