वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्णसंख्येतील वाढ बुधवारीही कायम राहिली. सायंकाळी चारपर्यंतच्या चौवीस तासांमध्ये देशभरात 1 हजार 076 नवीन रूग्ण आढळून आले. एकुण रूग्णसंख्या 11 हजार 921 इतकी झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी बाधित रूग्णांची संख्या अधिक असणारे 170 जिल्हे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. 207 जिल्हय़ांमध्ये बाधितांची संख्या वाढण्याचा धोका कायम आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या 24 तासांमध्ये देशात सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आढळले एकुण 117 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून यामधील 66 आणि 44 हे अनुक्रमे मुंबई आणि पुणे येथील आहेत. देशभरात कोरोना विषाणूचा संसर्गाने आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला आहे. 1344 जण पूर्ण बरे झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
हॉटस्पॉट, हॉटस्पॉट नसलेले आणि एकही रूग्ण न आढळलेले ग्रीन झोन अशी देशातील जिल्हय़ांची वर्गवारी करण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित केली आहेत. अन्य 207 जिल्हय़ांमध्ये बाधितांची संख्या वाढण्याचा धोका कायम आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले. रूग्ण संख्यांच्या निकषानुसार चाचणीची साधणे राज्यांना पुरविण्यात येत आहेत. एकुण 73 लाख चाचणी साधने खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत 23 लाख चाचणी साधने मिळाली आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, 30 एप्रिलपर्यत रेल्वेला 30 हजार व्यक्तिगत संरक्षण साधने तयार करण्यात आले आहेत. मे महिन्यापर्यंत याची संख्या एक लाख करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.









