देशात एका दिवसात 20.61 लाख नमुन्यांची चाचणी- कोरोनामुक्तांची संख्याही वाढतेय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात एका दिवसांत सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्याचा उच्चांक गुरुवारी गाठला गेला. देशात गुरुवारी विक्रमी 20 लाख 61 हजार 683 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात एका दिवसात केल्या जाणाऱया चाचण्यांचा सर्वात मोठा आकडा असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी करण्यात आला. आतापर्यंत 32 कोटीहून जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशात नव्या बाधितांमध्येही घट होत असून गुरुवारी दिवसभरात 2 लाख 59 हजार 551 इतके रुग्ण सापडल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 20 मे रोजी एका दिवसात 20 लाख 61 हजार 683 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. तसेच कोविड-19 मध्ये आतापर्यंत 32 कोटी 44 लाख 17 हजार 870 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान या महिन्याच्या अखेरीस 25 लाख चाचण्या आणि जून अखेरीस 45 लाख चाचण्या दररोज करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत सर्वाधिक नमुने घेण्याचे प्रमाण असून 2.2 कोटी लोकसंख्येमागे सुमारे 1.8 कोटी चाचण्या झाल्या आहेत. त्यानंतर कर्नाटकचा क्रमांक आहे. येथे 6.6 कोटी लोकसंख्येमागे 2.8 कोटी चाचण्या घेण्यात झाल्या आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशात 22.5 कोटी लोकसंख्येमागे सर्वाधिक 4.6 कोटी चाचण्या झाल्या आहेत.
देशात सध्या दुसऱया लाटने देशात हाहाकार माजवला. दुसऱया लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा कस लागला. यावर उपायोजना करण्यासाठी टेस्टिंग, टेसिंग आणि टेकिंगवर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने कोरोना टेस्टमध्ये आघाडी घेतली आहे. देशभरात आतापर्यंत 32 कोटीहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी मंगळवारीही देशात विक्रमी 20 लाख 8 हजार 296 कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. तर 11 मे रोजीही 19 लाख 83 हजार 804 टेस्ट करण्यात आल्या होत्या, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
लसीकरणालाही गती
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोना लसीचे 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 डोस देशभरात देण्यात आले आहेत. तर गुरुवारी एकाच दिवशी देशात 14 लाख 82 हजार 754 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
दिवसात साडेतीन लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
देशात गुरुवारी दिवसभरात 3 लाख 57 हजार 295 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बुधवारच्या तुलनेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 953 ने कमी झाली आहे. बुधवारच्या तुलनेत देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. देशात गुरुवारी एकाच दिवसात 2 लाख 59 हजार 551 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 4,209 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात बुधवारी 2.76 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती, तर 3,874 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात नवीन कोरोनामध्ये भर पडत आहे.
देशात कोविड संसर्गाची एकूण 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचवेळी, कोरोनामधून आतापर्यंत 2 लाख 91 हजार 331 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. देशात सध्या कोरोनाचे 30 लाख 27 हजार 925 सक्रिय रुग्ण आहेत.









