नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात सोमवारपर्यंत आणखी 61 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 31 लाखांवर पोहोचला आहे. मात्र, दिवसभरात 57 हजार 469 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्यांचा आकडा 23 लाख 38 हजार 35 इतका झाला आहे. मागील 24 तासात 836 जणांचा बळी गेल्याने मृतांचा आकडा 57 हजार 542 इतका झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा झाली असून आता तो 75 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांच्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या थोडीफार कमी झाली. गेल्या काही दिवसात 68 हजारांच्या पुढे असलेली रुग्णसंख्या सोमवारी 61 हजार 408 वर नियंत्रित राहिली. तरीही बाधितांचा एकूण आकडा मात्र 31 लाख 6 हजार 348 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडाही नियंत्रणात असल्याने आणि डिस्चार्ज मिळणाऱया रुग्णांची संख्या वाढल्याने मृत्यूदर 1.85 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सध्या देशात अजूनही 7 लाख 10 हजार 771 सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
आतापर्यंत साडेतीन कोटींहून अधिक चाचण्या
आतापर्यंत देशात 3 कोटी 59 लाख 2 हजार 137 स्वॅब चाचणी करण्यात आल्याची माहिती ‘आयसीएमआर’ने दिली आहे. रविवारी एका दिवसात 6 लाख 9 हजार 917 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 61 हजार 408 अहवाल पॉझिटिव्ह सापडल्याचेही स्पष्ट करण्यात आले. प्रयोगशाळांमधून चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला असून मागील आठवडय़ात एका दिवसात 8 ते 9 लाखपर्यंत चाचण्याही करण्यात आल्या होत्या.
‘मिशन कोविड सुरक्षे’साठी 3,000 कोटींची तरतूद
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच आता लसनिर्मिती आणि लसीचे वितरण पारदर्शकपणे करण्यासाठी सरकार रणनीती आखत आहे. कोरोना संसर्ग कृती दल आणि केंद्रीय आरोग्य व गृह मंत्रालय समन्वयाने यासंबंधीचे नियोजन करत आहे. त्यानुसार ‘मिशन कोविड सुरक्षा’ कार्यक्रम निश्चित करून पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या संपूर्ण मिशनसाठी केंद्र सरकारने 3 हजार कोटी रुपये इतका निधी पहिल्या टप्प्यात देण्याचे निश्चित केले आहे. हा निधी लसनिर्मिती, वितरण, कार्यप्रणाली निश्चित करणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी आदी कामांसाठी वापरला जाणार असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
भारतात सध्या कोरोनावरील तीन लसींचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या लसींच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्यास चालू वर्षअखेरपर्यंत देशात लसीकरण सुरू केले जाणार आहे. लसीकरणाचा हा कार्यक्रम कोरोना संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत राबवला जाणार आहे. त्यानुसार सद्यस्थितीत पुढील किमान एक ते दीड वर्षापर्यंत तरी ही प्रक्रिया सुरूच राहण्याची शक्यता आहे.
जनतेला सहज उपलब्ध व परवडणारी देशातील सुरक्षित आणि प्रभावी कोव्हिड नियंत्रित लस तयार करण्याच्या व उत्पादनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी ‘मिशन कोविड सुरक्षा’ स्थापन करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी 30 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमावर केंद्र सरकारचे लक्ष राहणार आहे. प्रस्तावित मिशनबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी सरकारी पातळीवर याबाबतचा आराखडा तयार केला जात आहे.









