वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात मागील 24 तासांमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले नवे 3320 रूग्ण आढळले. उपचार सुरू असणाऱया 95 जणांचा मृत्यू झाला. एकुण रूग्णसंख्या 59 हजार 662 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी शनिवारी दिली.
देशभरात 17 हजार 847 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. 39 हजार 834 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोना बळींची संख्या 1981 झाली आहे. सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्येही रूग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मागील 24 तासांमध्ये येथे 108 नव्या रूग्णांची भर पडली. 11 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील मृतांचा आकडा 99वर पोहचला आहे, अशी माहिती पश्चिम बंगालचे गृह सचिव अलपन बंदोपाध्याय यांनी दिली.
‘सीआयएसएफ’चे 13 जवान बाधित
मागील 24 तासांमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ)
13 जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत या दलातील 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या 200 जवानांना तर अर्धसैनिक दलाचे एकुण 500 जवान कोरोनाबाधित झाले आहेत. यातील 95 टक्के हे दिल्लीत तैनात असणार आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 714 पोलीस कर्मचाऱयांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील 648 जणांवर उपचार सुरू आहेत. 61 जण पूर्ण बरे झाले आहेत तर 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.








