ऑनलाईन टीम/तरुण भारत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास २६.४२ टक्क्यांनी खाली आल्या आहेत. असे असतानाही देशात पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा भडका उडत आहे. गेल्या सात दिवसांत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सात वेळा वाढ केली आहे. दरम्यान, देशभरात इंधन दरवाढ सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. विशेष म्हणजे देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०२१ पासून इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे. मंगळवारी म्हणजेच २२ तारखेपासून देशात इंधन दरवाढ होत आहे.
दरम्यान, आज पेट्रोल दरात ८० पैसे आणि डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ करण्यात आली आहे. या दर वाढीमुळे देशभरातील मोठ्या शहरात पेट्रोलच्या दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दिल्लीत आज पेट्रोलचा दर १००.२१ रुपये प्रति लिटर झाला आहे आणि डिझेल ९१.४७ रुपये प्रति लिटर विक्री होत आहे.
तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर पेट्रोलच्या दरात ८५ पैशांची आणि डिझेलच्या दरात ७५ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत आज पेट्रोल ११५.०४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९९.२५ रुपये लिटर झाले आहे.